सूडानमध्ये सर्वात मोठे मानवीय संकट : ट्रम्प
अन्नधान्य-औषधांची टंचाई : जागतिक हस्तक्षेपाची गरज
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
सूडान या देशात ‘भयानक अत्याचार’ होत असून स्थिती अत्यंत बिघडल्याने जगातील ‘सर्वात मोठे मानवीय संकट’ निर्माण झाल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले अहे. सूडानमध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून तो देश पृथ्वीवरील सर्वात हिंसक स्थान ठरला आहे. सूडानमध्ये अन्नधान्यापासून वैद्यकीय सुविधांची कमतरता निर्माण झाली आहे. जगातील अनेक नेते, खासकरून सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना सूडानमधील हिंसा त्वरित रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. सूडान कधीकाळी महान संस्कृती असलेला देश होता, जो आता अत्यंत वाईट अवस्थेत पोहोचला आहे. क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय देश एकत्र आल्यास स्थिती सुधारली जाऊ शकते. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त आणि अन्य मध्यपूर्वेतील देशांसोबत मिळून ही हिंसा रोखणे आणि सूडानमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी काम करू. असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दोन वर्षांपासून गृहयुद्ध
सूडानमध्ये 2 वर्षांपासून रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) आणि सूडानच्या सैन्यादरम्यान (एसएएफ) हिंसक संघर्ष सुरू आहे. आरएसएफने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ समुहाच्या संघर्षविराम प्रस्तावाला मान्य करण्यास सहमती दर्शविली आहे. नागरिकांची सुरक्षा वाढविणे आणि युद्धाचा भीषण मानवीय प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही मानवीय संघर्षविराम मान्य करतो असे आरएसएफने म्हटले आहे.