‘अशा भेटींचा विपर्यस्त अर्थ काढू नये’
पंतप्रधान मोदी यांच्या गणेशपूजनासंबंधी सरन्यायाधीशांनी टीकाकारांना खडसावले
वृत्तसंस्था / मुंबई
राजकीय नेते आणि न्यायाधीश यांच्यात होणाऱ्या खासगी भेटींचा विपर्यस्त अर्थ काढणे अत्यंत अयोग्य आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. गणेशोत्सव काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी केलेले श्रीगणेशाचे पूजन हा टीकेचा विषय बनला होता. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आदी पक्षांनी आक्षेप घेतलेला होता. त्यासंबंधात सरन्यायाधीश चंद्रचूड मुंबईतील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
देशाचे नेते किंवा राज्यांचे मुख्यमंत्री जेव्हा न्यायाधीशांना भेटतात, तेव्हा अशा भेटींमध्ये कधीही न्यायलयातल्या प्रकरणांसंबंधी चर्चा केली जात नाही. न्यायाधीशांना आणि राजकीय नेत्यांना अन्य अनेक कारणांसाठी एकमेकांना भेटावे लागते. त्यामुळे अशा भेटींकडे संशयाने पाहणे योग्य नाही. राजकीय नेते आणि न्यायपालिका यांच्यात संबंध असणे यात अयोग्य असे काही नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणांव्यतिरिक्त अनेक कामांसाठी अशा भेटी व्हाव्या लागतात. आपली राजव्यवस्था परिपक्व असून ती अशा संशयांना थारा देत नाही. त्यामुळे अशा भेटींकडे समंजसपणे पाहणे आवश्यक आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी टीकाकारांना खडसावले.
कामे कोणती असतात...
अनेक राज्यांचे मुख्यमंत्री नियमितपणे उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना भेटत असतात. संशयात्म्यांनी अशा भेटींसंबंधी विचार करु नये. न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांसाठी निधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांकडून दिला जातो. हा निधी न्यायाधीशांना मिळत नाही. न्यायालयांसाठी नव्या वास्तूंची आवश्यकता असते. न्यायाधीशांसाठी सरकारी निवासस्थानांची निर्मिती करायची असते. अन्य पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. या सर्व सुविधा सरकारकडूनच दिल्या जात असतात. त्यासंबंधात न्यायाधीश आणि मुख्यमंत्री किंवा देशाचे नेते यांच्या भेटी होतात. प्रत्येक बाब लेखी किंवा पत्राद्वारे केल्यास कोणते काम कधी पूर्ण होणारच नाही. त्यामुळे व्यक्तिगत गाठीभेटी आवश्यक असतात. जेव्हा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते, त्या नियुक्तीआधी संबंधित न्यायाधीश मुख्यमंत्र्यांना भेटतात. नियुक्ती झाल्यानंतरही भेटतात. या भेटींमध्ये अशा सर्वसामान्य विषयांवरच चर्चा केली जाते. ही चर्चा कधीही न्यायप्रविष्ट प्रकरणांसंबंधी किंवा न्यायदानासंबंधी केली जात नाही. त्यामुळे ज्यांना संशयाने घेरलेले आहे, त्यांनी स्वत:च्या मनातून तो दूर करावा आणि स्वच्छ दृष्टीने अशा भेटींकडे पहावे, असा खोचक सल्लाही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला.
प्रकार काय होता...
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात पाचव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन तेथील गणपतीचे पूजन केले होते. त्यावेळी सरन्यायाधीशांचे कुटुंबीयही उपस्थित होते. या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रण प्रसिद्ध झाल्यानंतर गदारोळ उठला होता. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाने या भेटीला आक्षेप घेत सरन्यायाधीशांवरही टीका केली होती. या टीकेला सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्वत:च्या निवृत्तीपूर्वी उत्तर दिले आहे.