अशी ही अतूट मैत्री
अनेक प्राणी प्रजातींचे एकमेकींमध्ये अजिबात पटत नाही, हे आपल्याला माहिती आहे. कोणताही प्राणी आपल्या प्रजातीतील प्राण्याशिवाय दुसऱ्याशी मैत्री करत नाही. कित्येक प्रजाती तर एकमेकींच्या हाडवैरी असतात. कुत्रा आणि कोंबडा यांच्या सख्य होऊ शकेल अशी कल्पनाही आपण करु शकत नाही. कारण कोंबडा हा कुत्र्याचे भक्ष्य असतो. त्यामुळे संधी मिळाली की कुत्रा कोंबड्याचा घास घेतो. त्याचप्रमाणे माकडाचेही या दोनी सजीवांशी पटत नाही. माकडे गोळा झाली की कुत्री त्यांच्यावर भुंकून त्यांना घालविण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, एका व्यक्तीने हे तिन्ही सजीव एकत्र पाळले आहेत आणि त्यांच्यात जीवाभावाची मैत्री घडवून आणली आहे. कोंबडा आणि माकड यांना कुत्रा आपल्या कुशीत घेऊन झोपताना पहावयास मिळतो. या प्रेमळ कुत्र्याची कोंबड्याला मुळीच भीती वाटत नाही. तसेच माकडही कुत्र्याशी गोडीगुलाबीने वागताना दिसते. सध्या हा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असून त्याला लक्षावधी लाईक्स मिळाले आहेत.
लहानपणापासून असे भिन्न प्रजातीचे सजीव एकत्र पाळले तर त्यांच्यात सहवासाने मैत्री निर्माण होते, असे अनेकदा घडले आहेत. विशेषत: अनेक घरांमध्ये कुत्रे आणि मांजरे एकत्र पाळलेली असतात. खरे तर मांजर कुत्र्याच्या वाऱ्यालाही उभे रहात नाही. तथापि, या परस्परांपासून दूर राहणाऱ्या या भिन्न प्रजातींचे प्राणी एकत्र वाढले तर ते एकमेकांचे मित्र होतात. इतके, की त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही. असाच या व्हिडीओतील प्रकार आहे.