अशीही एक अद्भूत प्रथा...
विवाह हा मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. त्यामुळे विवाहाची जोडल्या गेलेल्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. जगाच्या प्रत्येक भागात या प्रथा आणि परंपरा भिन्न भिन्न प्रकारांच्य असल्याचे दिसून येते. त्यांच्यापैकी अनेक सामान्य परंपरा आता अंगवळणी पडल्याने त्यांचे महत्व विषेश जाणवत नाही. पण काही प्रथा अशा असतात की त्या कशा आणि का निर्माण झाल्या असतील अशा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून रहात नाही.
ब्रिटनचा भाग असलेल्या स्कॉटलंड या प्रदेशात अशीच एक प्रथा आहे. येथे विवाहाच्या एक रात्र आधी वधू आपल्या मैत्रिणींना भेटते. त्यानंतर ती आपल्या घराच्या नजीक भूमीत एक लहान खड्डे खोदते आणि त्यात मांसाचा एक तुकडा पुरते. ही प्रथा का पडली आणि असे केल्याने काय होते, यावर आजही चर्चा केली जाते. अनेकजण अनेक कारणे देतात. पुरले जाणारे मांस हे ‘सॉसेजिस’ या पदार्थाचे असते. हा पदार्थ मांसाचे बारीक तुकडे करुन केला जातो. हा पदार्थ जगात अनेक स्थानी सकाळच्या न्याहारीच्या वेळी खाल्ला जातो.
या प्रथेमागचे कारण असे सांगितले जाते, की, असे मांस पुरल्याने लग्नाच्या दिवशी पाऊस येत नाही आणि त्यामुळे विवाह सोहळ्याचा रसभंग होत नाही. विवाहाच्या दिवशी आकाश निरभ्र राहिल्यास विवाह समारंभाचा आनंद अधिकच वाढतो. कारण पाऊस आल्यास सारा कार्यक्रम विस्कळीत होतो. ही प्रथा इतकी बळकट आहे, की आधुनिकतेलाही तिने हरविले आहे, असे दिसून येते.