तस्करीचा असाही मार्ग...
तस्करी किंवा स्मगलिंग हा साऱ्या जगातील बेकायदेशीर पण मोठा व्यवसाय आहे. आयात कर चुकवून एखादी वस्तू देशात आणणे किंवा ज्या वस्तूवर बंदी आहे, ती विदेशातून आणणे याला स्मगलिंग किंवा तस्करी असे म्हणतात. सध्या मादक द्रव्यांची तस्करी सर्वात अधिक चालते. त्याखालोखाल सोन्याचा क्रमांक लागतो. तस्करीसाठी लोक कोणते मार्ग शोधून काढतील, याचा काही नेम नसतो. विमानतळांवरील आयतशुल्क अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन तस्करीच्या वस्तू देशाता आणण्यासाठी असंख्य क्लृप्त्या योजिल्या जातात. शरीराच्या विविध भागांमध्ये अशा वस्तू लपविणे हा नित्याचाच मार्ग असतो. तथापि, एका महिलेने दुबईहून भारतात बेकायदेशीर मार्गाने सोने आणण्यासाठी जी युक्ती शोधून काढली होती ती पाहून आयातशुल्क अधिकारीही अवाक् झाल्याची घटना घडली आहे.
ही महिला दुबईहून भारतात आली. तिच्या सामानामध्ये सर्फची पावडरही होती. आता सर्फची पावडर अनेक प्रवासी घेऊन जातात किंवा घेऊन येतात. हा निरुपद्रवी आणि नित्योपयोगी पदार्थ आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात खरे तर कोणत्याही संशयाची शक्यता नसते. तथापि, या महिलेच्या सर्फमध्ये काहीतरी गूढ दडलेले आहे, असा संशय आयातशुल्क अधिकाऱ्यांना आला. त्यांनी सर्फचा पुडा फोडून त्यातील थोडी पूड पाण्यात टाकली. जी खरी सर्फची पूड होती ती पाण्यात विरघळली. मात्र, पिवळ्या रंगाचे काही द्रव्य विरघळले नाही. त्याचे परीक्षण केले असता ते शुद्ध सोने असल्याचे दिसून आले. ही युक्ती अधिकाऱ्यांनाही नवी होती. त्यामुळे ते आश्चर्यचकीत झाले. पुढे या महिलेची चौकशी केली असता ती एका मोठ्या तस्करी टोळीची सदस्य असल्याचे दिसून आले. या टोळीने हा अनोखा मार्ग शोधला होता. सोन्याची बारीक पूड करुन ती बेमालुमपणे डिटर्जंट सर्फ पावडरमध्ये मिसळण्यात आली होती. पण ही युक्ती अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने या टोळीने शोधलेला हा अनोखा मार्ग वाया गेला होता.