इतकी स्वच्छ नदी
सध्या आपल्या देशातील बव्हंशी सर्व नद्यांची अवस्था शोचनीय झाली आहे. सर्व प्रकारची मानवनिर्मित किंवा उद्योगनिर्मित घाण त्यांच्यात कोणतीही प्रक्रिया न करता सोडली जाते. त्यामुळे अनेक नद्यांचे पाणी आज पिण्याच्या लायकीचे राहिलेले नाही, असे दिसून येते. सजीवांची जीवनदायीनी असणाऱ्या अशा कित्येक नद्या आज स्वत:च मृत्यूपंथाला लागलेल्या आहेत, असे दिसून येते. तथापि, ब्राझील या देशात रिओ सुकुरी नामक एक नदी अशी आहे, की जी तिच्या उगमापासून समुद्रप्रवेशापर्यंत अत्यंत स्वच्छ आणि निखळ आहे. या नदीच्या काठावर उभे राहिले असता, तिच्या तळातील दगडगोटे स्वच्छपणे दिसून येतात. या नदीचे पाणी काचेसारखे पारदर्शक आणि नितळ आहे. या नदीइतकी स्वच्छ नदी जगात नाही असे काही जणांचे म्हणणे आहे. ही नदी तशी मोठी असून वनांमधून वहात जाते. प्रारंभापासून शेवटपर्यंत तिने आपली स्वच्छता टिकविली आहे, हे तिचे वैशिष्ट्या आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्राला अद्याप मानवाचा स्पर्श झालेला नाही, म्हणून ती इतकी स्वच्छ आहे, असेही अनेक तज्ञांचे मत आहे. अर्थात, अशा प्रकारची ही एकमेव नदी आहे असे नाही. भारताच्या मेघालय राज्यात दावकी नामक नदी अशीच स्वच्छ आहे. तिला उमंगोट नदी असेही संबोधतात. ही नदी छोटी असून मॉलिनाँग या गावाजवळून वाहते. या गावालाही 2003 मध्ये आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून सन्मान मिळाला होता.