अशीही एक वास्तू...
या जगात एकाहून एक सरस असणाऱ्या वास्तूंची संख्या हजारोंनी आहे. अशा प्रत्येक वास्तूचे स्वत:चे असे वैशिष्ट्या असते. या वैशिष्ट्यांमुळे या वास्तू जगाच्या चर्चेचा विषय बनतात. त्यांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात आणि अशा वास्तूंपासून प्रेरणा घेऊन तशाच अद्भूत नव्या वास्तूही निर्माण केल्या जातात.
अशाच एका वास्तूची सध्या चर्चा होत आहे. ही वास्तू कर्नाटकची राजधानी बेंगळूरमध्ये असून ती निर्माण करण्यासाठी 2 कोटी डॉलर्स, म्हणजेच जवळपास 170 कोटी रुपये खर्च आला आहे. ही वास्तू चारशे फूट उंचीच्या एका इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर बांधण्यात आली असून ती अमेरिकेचे अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या ‘व्हाईट हाऊस’सारखी दिसते. जगातील सर्वात अत्याधुनिक अशा सोयींनी ती युक्त असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
मात्र, या वास्तूचे वैशिट्या असे की ती आता पूर्ण झालेली असूनही तिचा मालक तिच्यात प्रवेश करु शकत नाही. त्यामुळे हा मालक कोण असा प्रश्न कोणाच्याही मनात येणे साहजिकच आहे. भारतातील विविध बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून भारतातून पळून गेलेल्या विजय मल्ल्या यांची ही वास्तू आहे. ते आता भारतात नसल्याने या वास्तूत प्रवेश करु शकत नाहीत. त्यामुळे ती मालकाची वाट पहात रिकामी पडून आहे. ही वास्तू खरेतर 2010 मध्येच पुष्कळशी पूर्ण झाली होती. पण त्यानंतर दोन वर्षांमध्ये विजय मल्ल्या यांचा उद्योगसाम्राज्याला उतरती कळा लागली. 2016 मध्ये कारवाईच्या भीतीने ते भारतातून पळून गेले. त्यानंतर या वास्तूकडे कोणाचेही लक्ष गेलेले नव्हते. पण मल्ल्या यांच्यावर कर्जवसुलीच्या कारवाईचा प्रारंभ झाल्यानंतर ही वास्तू पुन्हा उजेडात आली. या वास्तूचे काही टक्के स्वामित्व मल्ल्या यांच्या औद्योगिक कंपन्यांचेही आहे. आता ही आलिशान वास्तू बहुतेक सरकारजमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.