होडीसह सात मच्छीमारी बांधवांना वाचविण्यात यश
कारवार : गोव्याच्या बेतुल प्रदेशातील अरबी समुद्रात बुडणाऱ्या पर्सीन मासेमारी होडीला आणि होडीवरील सात मच्छीमारी बांधवांना वाचविण्यात येथील मासेमारी बांधवांना यश आले. या घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी, मंगळूर येथील इंदाद यांच्या मालकीची रॉयल ब्ल्यू नावाची पर्सीन मासेमारी होडी येथून 30 नॉटीकल माईल्स अंतरावरील अरबी समुद्रात (गोव्यातील बेतुलजवळ) अडचणीत सापडली होती. या होडीला एशियन ब्ल्यू, सी फ्लेवर, सी प्रीन्स व्हाईट अर्बिट, ब्लॅक बेरी, सी हंटर या मासेमारी होड्यांनी बुडणाऱ्या होडीला वाचविले आणि ओढून येथील बैतखोल मासेमारी बंदरात आणले. अडचणीत सापडलेल्या होडीच्या तळाची नासधूस झाल्याने पाणी होडीत शिरले होते. होडीतील पाण्याचा उपसा पंपसेटने करण्यात आला आणि बुडण्याच्या स्थितीत असलेली होडी व होडीवरील सात मच्छीमारी बांधवांना सुखरुपपणे वाचविण्यात यश आले.