देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वे इंजिनचे यशस्वी परीक्षण
डिझेलच्या तुलनेत खूपच किफायतशीर : भारतीय रेल्वेची मोठी कामगिरी
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय रेल्वेने देशाच्या पहिल्या हायड्रोजन पॉवर्ड कोचचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे परीक्षण चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत पार पडले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कामगिरीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. भारत 1200 अश्वशक्तीची हायड्रोजन ट्रेन विकसित करत असून जी याला जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेंपैकी एक ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय रेल्वेकडून विकसित 1200 अश्वशक्तीच्या क्षमतेची रेल्वे ही जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन यासारख्या देशांमध्ये असलेल्या हायड्रोजन रेल्वेंपेक्षा अधिक शक्तिसील असणार आहे. या देशांमधील हायड्रोजन रेल्वेची क्षमता 500-600 अश्वशक्तीदरम्यान आहे. भारतात निर्मित रेल्वे हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानावर आधारित असून ती हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक प्रतिक्रियेतून ऊर्जा निर्माण करते.
या प्रक्रियेत पाणी अन् वाफ बाय-प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडते. म्हणजेच ही पूर्णपणे शून्य उत्सर्जन प्रक्रिया आहे. ही रेल्वे पारंपरिक डिझेल आणि कोळशाद्वारे धावणाऱ्या रेल्वेंच्या तुलनेत 60 टक्के कमी आवाज निर्माण करते, यामुळे प्रवाशांना शांत अन् आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
ही हायड्रोजन रेल्वे भारतीय रेल्वेच्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ प्रकल्पाचा हिस्सा आहे. याच्या अंतर्गत 2030 पर्यंत भारतीय रेल्वेला नेट-झिरो कार्बन उत्सर्जनाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचविण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी 2023-24 या आर्थिक वर्षात 2800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
या प्रकल्पाच्या अंतर्गत 35 हायड्रोजन फ्यूल सेल-आधारित रेल्वे विकसित करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे. प्रत्येक रेल्वेसाठी अनुमानित खर्च 80 कोटी रुपये असून यासाठी प्रतिमार्ग 70 कोटी रुपयांचा अतिरिक्त ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर खर्च येणार आहे. ही रेल्वे विशेषकरून हेरिटेज आणि पर्वतीय मार्ग म्हणजेच कालका-शिमला, दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे, नीलगिरी माउंटेन रेल्वे आणि कांगडा खोरे रेल्वेसाठी डिझाइन करण्यात आली आहे