For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आकाश’च्या अत्याधुनिक आवृत्तीचे यशस्वी परीक्षण

06:25 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आकाश’च्या अत्याधुनिक आवृत्तीचे यशस्वी परीक्षण
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

‘आकाश’ या क्षेपणास्त्राच्या नव्या पिढीतील अत्याधुनिक आवृत्तीचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) शुक्रवारी संस्थेच्या ओडीशा सागरतटानजीकच्या चांदीपूर येथील क्षेपणास्त्र परीक्षण केंद्रामध्ये ते करण्यात आले आहे. या नवीन क्षेपणास्त्रामुळे भारताच्या सेनादलांचे सामर्थ्य अधिकच वाढणार असल्याचे प्रतिपादन संस्थेने केले असून लवकरच हे क्षेपणास्त्र सेनादलांमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.

‘आकाश’ हे भूपृष्ठावरुन आकाशातील लक्ष्यांचा भेद करणारे क्षेपणास्त्र आहे. ते भूसेनादल आणि नौसेनादल या दोन्ही दलांसाठी उपयुक्त आहे. नव्या आकाश क्षेपणास्त्राचे नाव ‘आकाश-एनजी’ असे ठेवण्यात आले आहे. आकाशात वेगाने हालचाल करणाऱ्या लक्ष्यावर हे क्षेपणास्त्र सोडून त्याच्या क्षमतेचे परीक्षण करण्यात आले. क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्याचा भेद केला, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

पूर्ण भारतनिर्मित संच

क्षेपणास्त्रे, ती डागण्याची यंत्रसामग्री, लक्ष्याचा वेध घेण्यासाठी आवश्यक असणारी रडार आणि टेलिमेट्री यंत्रणा, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग व्यवस्था असा एक परिपूर्ण क्षेपणास्त्र संच निर्माण करण्याचे कार्य या संस्थेने हाती घेतले असून ही निर्मिती संपूर्णपणे भारतात विकसीत केलेल्या तंत्रज्ञानानुसार होत आहे. नवे परीक्षण हे या कार्याला वेगाने पुढे नेणारे आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षण

‘आकाश-एनजी’ या क्षेपणास्त्राचे परीक्षण भारतीय भूसेना दल, वायूसेनादल आणि नौसेनादल यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. डीआरडीओचे संशोधक आणि अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते. आकाश-एनजी ही एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून विकसीत देशांच्या अशाच प्रकारच्या प्रणालींशी ती स्पर्धा करू शकेल, असा विश्वास तज्ञ व्यक्त करीत आहेत.

राजनाथसिंगांकडून अभिनंदन

भारतात अशी अत्याधुनिक क्षेपणास्त्र व्यवस्था निर्माण केल्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी डीआरडीओच्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे. या क्षेपणास्त्रनिर्मितीत भारतातील काही खासगी उद्योगांचेही मोलाचे योगदान आहे. तसेच इतर काही सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनीही त्यांचा वाटा उचलला आहे. या सर्वांचे अभिनंदन राजनाथसिंग यांनी केले असून भविष्यकाळात संरक्षण सामग्री निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचे प्रयत्न वेगाने करण्यात येतील. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादनही राजनाथसिंग यांनी केले.

Advertisement
Tags :

.