‘भार्गवास्त्र’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण
संपूर्णत: स्वदेशनिर्मित शस्त्रामुळे वायुदलाला बळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने संपूर्णत: स्वदेशनिर्मित असणाऱ्या ‘भार्गवास्त्र’ नामक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या ड्रोन्सचा आकाशातच नाश करणारे आहे. ओडिशा राज्याच्या गोपालपूर येथील समुद्रानजीक असणाऱ्या फायरिंग रेंजमध्ये या क्षेपणास्त्राचे हे परीक्षण करण्यात आले, असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नव्या युद्धतंत्रात ड्रोन्सचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे. छोट्या ड्रोन्सचा मारा करून शत्रूसैन्याला जेरीस आणण्याचे डावपेच हे नव्या युद्धतंत्राचा भाग ठरले आहेत. रशिया-युक्रेन युद्धात तसे नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन भारताने आपल्यावर चालून येणाऱ्या ड्रोन्सचा नाश करण्यासाठी हे नवे साधन शोधले आहे, अशी माहिती भारताच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली.
ड्रोन्स हे स्वस्त शस्त्र
ड्रोन्स मानवरहीत असतात. तसेच त्यांची निर्मिती स्वस्तात करता येते. फार मोठे किंवा जटील तंत्रज्ञान त्यासाठी लागत नाही. ते स्वस्त असल्याने त्यांचा नाश झाला तरी फारशी आर्थिक हानी होत नाही. मात्र, या ड्रोन्सवर जी स्फोटके बसविलेली असतात, ती घातक असतात. त्यामुळे असे ड्रोन जर लक्ष्यावर आदळले तर ते मोठी हानी करु शकते. त्यामुळे अशा स्वस्त ड्रोन्सचा उपयोग करण्याकडे आता बऱ्याच देशांचा कल वाढत आहे. भारतानेही अशा ड्रोन्सच्या निर्मितीचे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. तसेच शत्रूचे ड्रोन्स पाडविण्याचे तंत्रज्ञानही भारताकडे आहे.
सर्व अपेक्षा पूर्ण
या नव्या भारतनिर्मित अस्त्राने त्याच्या परीक्षणात सर्व पूर्वनिर्धारित अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यवेध करणारे असून एकाच वेळी अनेक ड्रोन्सचा नाश करु शकते. त्याची निर्मिती भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसीत केले असून त्याची क्षमता या परीक्षणात सिद्ध झाली आहे. तीन वर्षांपांसून त्याच्या विकासासाठी प्रयत्न केले जात होते. या क्षेपणास्त्राच्या आणखी प्रगत आवृत्त्याही लवकरच निर्माण करण्यात येणार आहेत. वायुदलाची मारक क्षमता अधिक वाढविण्यासाठी या शस्त्राचा उपयोग होणार आहे.
‘भार्गवास्त्रा’चे महत्व
ड्रोन्स बनविण्यासाठी आणि शत्रूवर सोडण्यासाठी जितका खर्च येतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च ते पाडविण्यासाठी येतो. पण भार्गवास्त्र हे भारताने स्वबळावर विकसीत केलेले ड्रोनविरोधी अस्त्र कमी किमतीत शत्रूच्या ड्रोन्सचा नाश करते. त्यामुळे ते भारतासाठी अत्यंत लाभदायक ठरेल, अशी माहिती देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सशस्त्र संघर्षामध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा मारा भारतावर करण्यात आला होता. तथापि, भारताने तो आपल्या सध्या उपलब्ध असणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून तो हाणून पाडला. आता हे नवे क्षेपणास्त्र भारतीय वायुदलाच्या भात्यात येणार असल्याने त्याचे संरक्षण बळ अधिकच वाढणार आहे. या नव्या क्षेपणास्त्राची आणखी काही परीक्षणे पूर्ण झाल्यानंतर ते लवकरात लवकर भारतीय सैन्यात समाविष्ट करण्याची योजना आहे.
‘हार्डकिल’ तंत्रज्ञान
भार्गवास्त्र या क्षेपणास्त्रात हार्डकिल तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ते शत्रूने सोडलेल्या ड्रोन्सना ओळखून त्यांचा आकाशातच नाश करते. त्याचा पल्ला 2.5 किलोमीटरचा आहे. हे साधन लहान आकाराचे असून ते सामुहिकरित्या डागण्यात येते. त्यामुळे अनेक ड्रोन्स एकाचवेळी लाटांच्या स्वरुपात चालून आली, तरी भारताला ती फारसा खर्च करावा न लागला पाडविणे या क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे शक्य होणार आहे, असे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्या आहे.
अनेक वैशिष्ट्यांनी युक्त अस्त्र
ड कमी किमतीत शत्रूच्या ड्रोन्सचा नाश करण्याची क्षेपणास्त्राची क्षमता
ड 2.5 किलोमीटरचा पल्ला, शत्रूच्या ड्रोन्सना आकाशातच नष्ट करणार
ड लवकरच मोठ्या प्रमाणात या क्षेपणास्त्रांचे उत्पादन करण्याची योजना