For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News: गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप, 'तरुण भारत संवाद' तर्फे सत्कार

06:13 PM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur news  गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप   तरुण भारत संवाद  तर्फे सत्कार
Advertisement

या परीक्षेत जिह्यातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा यंदाही राखली

Advertisement

कोल्हापूर : तरुण भारत संवाद’ आणि श्रध्दा क्लासेस ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, श्रध्दा क्लासेस ऑफ इन्स्टिट्यूटचे ए. आर. तांबे, ‘तरुण भारत संवाद’चे विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, भौतिकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे, निवासी संपादक सुधाकर काशीद, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील, ‘लोकमान्य’चे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत जिह्यातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा यंदाही राखली. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच पालक आणि शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सकाळी 11 वाजल्यापासून जिह्यातील गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.

Advertisement

मोबाईलचा वापर आणि सोशल मीडियातील वावर यातून होणारे सायबर धोके विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत सांगताना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता म्हणाले, सर्व वयोगटातील मोबाईलधारकांनी सोशल मीडियातील वेगवेगळ्या अॅप्समध्ये गुंतून रहावे, अशाच पद्धतीने अॅप तयार केलेली असतात.

विद्यार्थ्यांनी नवीन मोबाईल वापरताना स्वत:ची कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय शेअर करु नये. विशेषत: मुलींनी अधिक काळजी घ्यावी. सायबर क्राईमच्या जाळ्यात चुकून अडकला तर आवर्जुन पालक, शिक्षक अथवा ‘पोलीस मामा’ला सांगा. वर्तमानपत्र नित्यनियमाने वाचण्याची सवय लावा.

जेणेकरुन बुद्धी तल्लख होईल आणि तुम्ही अपडेट रहाल. दिवसातून एकदा मित्र, मैत्रिणींबरोबर गप्पा मारा. पालकांसोबत दिवसभरातील अनुभव शेअर करा. मैदानी खेळांची सवय लावा. दिवसातील एक तास वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंगमध्ये घालवा.

कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनो, तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या फक्त तीनच व्यक्ती आहेत. ते म्हणजे तुमचे आई, वडील आणि शिक्षक. आयुष्यात कधीही नैराश्य, चिंता वाटली तर हडबडून जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्षपूर्ण इतिहास एकदा अशावेळी आठवा. शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याला दिशा देणारी असेल.

अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ म्हणाले, ‘तरुण भारत संवाद’चा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेसह जनरल नॉलेज वाढविण्यासाठी वृत्तपत्र वाचनाशिवाय पर्याय नाही. मोबाईलच्या रुपाने जगभरातील माहितीचा खजिना तुमच्या समोर आहे. एका क्लिकवर आणि एका क्षणात ज्ञानाचे भांडार तुमच्यासमोर या माध्यमातून खुले होते. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक उन्नतीसाठी खुबीने करा.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, ‘तरुण भारत संवाद’ने केलेल्या गुणवंतांच्या गौरवामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्यात मोठे पाठबळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी यापुढेही जिद्दीने शैक्षणिक वाटचाल करून यश मिळवावे. त्यासाठी पालकांच्या बरोबरीने आमचा शिक्षक वृंद कोठेही कमी पडणार नाही. याची यानिमित्ताने मी हमी देते. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशसेवेसाठी समाजाप्रती आस्था असणारी पिढी घडविणे हेच शिक्षण विभागाचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे.

प्रास्ताविकात डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, ‘तरुण भारत’ची 106 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. सीमालढ्यातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे. ‘तरुण भारत संवाद’ शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशाला आणि त्यांचे पालक, शिक्षकांना सलाम करत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे काम केले. आज शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे शाहूंच्या कार्याचे फलित आहे. ‘तरुण भारत संवाद’ नव्या रूपात वाचकांसमोर आणत आहोत. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या विषयांना अनुसरुन दररोज पुरवण्या देऊन वाचकांना बौद्धिक मेजवानी देत आहोत. ‘तरुण भारत’ची परंपरा आम्ही अधिक उज्ज्वल करत असून वाचकांचे उत्तम सहकार्य मिळत आहे.

सगळेच भारावले

जिह्यातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवाजी विद्यापीठसारख्या मानाच्या शैक्षणिक संकुलात झाला. शालेय विद्यार्थी दशेतच या गुणवंतांना विद्यापीठाचे भव्य शैक्षणिक स्वरुपाचे प्रथमच दर्शन झाले. उत्तुंग यशाची जिद्द बाळगत यापुढे वाटचाल करणाऱ्या गुणवंतांना शिवाजी विद्यापीठाचे यानिमित्ताने झालेले दर्शन प्रेरणादायी राहील. ‘तरुण भारत संवाद’ने आयोजित केलेल्या नेटक्या आणि सुनियोजित सत्कार सोहळ्यात आपला पाल्य, आपला विद्यार्थी यांचे झालेले कौतुक पाहून पालक आणि शिक्षकही भारावून गेले.

श्रध्दा क्लासचे ए. आर. तांबे म्हणाले, ‘तरुण भारत संवाद’ने हा

शिक्षणातील खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. ‘तरुण भारत’ने शिक्षणासारखे महत्त्वाचे काम हाती घेतले ही कौतुकास्पद बाब आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या प्रेरणादायी प्रांगणात हा सत्कार सोहळा होतो आहे हे विशेष महत्त्वाचे आहे. हा सत्कार सोहळा तुमच्या आयुष्यातील पहिला टप्पा आहे. अजून तुम्हाला आयुष्यातील उत्तुंग यशप्राप्तीकडे झेप घ्यायची आहे. ही क्षमता तुमच्यात नक्कीच आहे.

Advertisement
Tags :

.