कडोलीत ऐतिहासिक दसरोत्सवाची जय्यत तयारी
भगव्या पताका, झेंडे, स्वागतकमानी, विद्युत रोषणाईने गाव उजळले : यात्रेवर राहणार पोलिसांची नजर
वार्ताहर/कडोली
कडोली येथील जागृत देवस्थान, ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवालयाचा ऐतिहासिक उत्सव गुरुवार दि. 10 पासून सुरू होत असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगव्या पताका, झेंडे, स्वागत कमानी आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण गाव उजळून गेले आहे. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयादशमी दिवशी शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. सालाबादप्रमाणे साजरा होणारा कडोली गावच्या ऐतिहासिक दसरा उत्सवात यावेळी गुरुवारी अष्टमी, शुक्रवारी खंडेनवमी आणि शनिवारी भरयात्रा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान पंचकमिटी, हक्कदार आणि ग्रामपंचायतीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. गावातील सर्व युवक मंडळांना काही नियम घालून दिले आहेत. तर यात्रेच्या मुख्य दिवशी काही अनुचित घटना घडू नये, यात्रेवर नजर ठेवण्यासाठी मंदिर परिसर, प्रमुख मार्गावर मोक्याच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने तयारी केली आहे. तसेच काकती पोलीस ठाण्यातर्फे यात्रा काळात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
हुल्लडबाज तरुणांवर कारवाईचा निर्णय पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी घेतला आहे. यात्रा शांततेत पार पडण्यासाठी पोलीस ठाण्यातर्फे नुकतीच शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सव काळात पुढीलप्रमाणे धार्मिक विधी पार पडणार आहेत. गुरुवार दि. 10 रोजी अष्टमी असणार असून या दिवशी देवस्थानचे हक्कदारांच्यावतीने केळीची झाडे आणि बांबू तोडणी केली जाते. सायंकाळी सर्व मंदिरांमध्ये नारळ वाढविण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. शुक्रवारी खंडेनवमी साजरी होणार आहे. या दिवशी नवरात्रीला बसलेल्या भक्तांचा फलाहार देवून उपवास सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. शस्त्रपूजन, त्यानंतर रात्रभर केळीच्या झाडांची बन्नी बांधण्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे कळस चढविणे, काकड आरती, पूजा झाल्यानंतर बैलजोडींची मिरवणूक व दिवसभर भरयात्रा होणार आहे. सायंकाळी तरंगे आणणे धार्मिक विधीनंतर बन्नी मोडली जाणार आहे. त्यानंतर पालख्या सोने लुटण्यासाठी गावच्या सीमेवर जातील.