मनोज जरांगे-पाटील यांच्या शिवतीर्थावरच्या सभेची जय्यत तयारी
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे मागितली परवानगी : राजधानीत जरांगे-पाटील काय बोलणार याकडे नजरा
सातारा प्रतिनिधी
आता नाही तर कधीच नाही, जातीसाठी एकत्र या असे आवाहन करत सकल मराठा समाजाच्यावतीने राजधानी साताऱ्यात शिवतीर्थ येथे दि.18रोजी होणाऱ्या मनोज जरांगे - पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांना पत्र देऊन मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेची परवानगी सकल मराठा समाज व समविचारी संघटनानी मागितली आहे. दरम्यान, राजधानीत मनोज जरांगे - पाटील हे काय बोलणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे - पाटील यांनी राज्यभर वादळ उठवून दिले आहे. तिसऱ्या टप्प्यातली लढाई हाती घेतली आहे. धाराशिव येथील वाशीमध्ये त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करत राज्यातील 70 वर्षात होऊन गेलेल्या नेते मंडळींना चांगले शाब्दिक फटके दिले आहेत. सरकारला ही चांगले ठणकावून सांगितले आहे. जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर खरडा भाकरी घेऊन मंत्रालय पाहायला राज्यातला मराठा समाज येईल असा इशारा दिला आहे. मनोज जरांगे - पाटील यांनी स्पष्ट शब्दात सत्ताधाऱ्यांना विरोधकांना सर्वच राज्यकर्त्याना आणि भोकरदनमध्ये गाव बंदीचा बॅनर फाडणाऱ्या तसेच मराठा समाजात दुही निर्माण करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. त्यामुळे राज्यभरात मनोज जरांगे - पाटील यांच्या सभांचे वादळ घोंघावत आहे. ते वादळ राजधानी सातारा शहरात दि.18 रोजी येत आहे. मनोज जरांगे - पाटील यांच्या सभेची सातारा शहरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची परवानगीचे पत्र सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिले असून यावेळी मराठा बांधव आणि समविचारी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा शहरातील सभेला येण्यासाठी सातारा तालुक्यातील 194 गावातील मराठा समाजातील बैठका सुरू आहे. स्वयंस्फूर्तीने दि. 18 रोजी मराठा समाज मोठ्या संख्येने सभेकरता शिवतीर्थ येथे दाखल होणार असून शिवतीर्थावर भगवा झंझावात होणार आहे.