For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी

10:36 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी
Advertisement

संपूर्ण देशभरात ऐतिहासिक घटनेचे स्वागत करणार : बेळगाव शहरामध्येही सर्वत्र राममय वातावरण

Advertisement

बेळगाव : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्री रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची घटिका जवळ येऊन ठेपली आहे. संपूर्ण देशभरातच या ऐतिहासिक घटनेचे स्वागत अभूतपूर्वरीत्या करण्यात येणार आहे. अर्थातच बेळगावसुद्धा त्याला अपवाद नाही. शहरामध्ये सर्वत्र सध्या राममय वातावरण जाणवत  आहे. बेळगावकरांनी या घटनेचे स्मरण चिरंतन रहावे, यादृष्टीने तयारी चालविली आहे. अर्थातच शहरात सर्वत्र गल्लोगल्ली अगदी उपनगरांमध्येसुद्धा भगव्या पताका लावल्या आहेत. गल्लींच्या प्रवेशद्वारापाशी श्रीरामाच्या प्रतिमांच्या भव्य कमानी उभारल्या आहेत. घराघरावर श्रीराम या अक्षरांचे ध्वज झळकत आहेत. काही हौशी तरुण मंडळींनी दिवाळीप्रमाणे या सोहळ्याचे स्वागत करा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्युत रोषणाईसुद्धा केली आहे.

सर्वच मंदिरामध्ये विशेष पूजा-अर्चा, चालिसा पठण

Advertisement

शहरातील राममंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चांचे आयोजन केले आहे. रामदेव गल्ली येथील राम मंदिर शंभर वर्षांपूर्वीचे आहे. लोकमान्य संचालित आचार्य गल्ली, शहापूर येथील श्रीराम मंदिरसुद्धा अत्यंत प्राचीन असून, या मंदिराची वास्तू स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. बिच्चू गल्ली शहापूर येथेही राममंदिर आहे. टिळकवाडी येथील श्री सामर्थ्य राम मंदिर या सर्व मंदिरांसह शहरातील सर्वच मंदिरांमध्ये सोमवारी विशेष पूजा-अर्चा, हनुमान चालिसा पठण, प्रसाद वितरण यांचे आयोजन करण्यात आले आहे.

बाजारपेठेत विविध साहित्य दाखल

बाजारपेठेतसुद्धा या सोहळ्याच्या अनुषंगाने विविध साहित्य दाखल झाले आहे. श्रीराम लिहिलेले अक्षर, ध्वज, टोप्या, टी-शर्ट, यांची विक्री सुरू आहे. राममंदिरांच्या प्रतिकृतीसुद्धा दाखल झाल्या आहेत. यादिवशी दीपोत्सव करावा, असेही आवाहन केल्याने, पणत्या आणि दिव्यांना पुन्हा मागणी वाढली आहे. सराफी पेढ्यांनी चांदीमधील राममंदिराची प्रतिकृती शिवाय नाणी तसेच सोन्याची नाणीसुद्धा उपलब्ध केली आहेत.

ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन

या सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शनिवारी शहरातील सरदार्स मैदान व व्हॅक्सिन डेपो मैदानावर हनुमान चालिसा पठण होणार आहे. ठिकठिकाणी या सोहळ्याचे प्रक्षेपण दिसावे या हेतूने भव्य स्क्रीन्स बसविल्या आहेत. भेंडीबाजार येथे दहा गल्ल्यांनी महाप्रसाद करण्याचे ठरविले आहे. समाजमाध्यमावर या घटनेबाबत विविध रिल्स बनविण्यात येत आहेत. रामावरील गाण्यांना प्रतिसाद मिळत असून महिला या गीतांच्या आधारे नृत्य करतानाही दिसत आहेत. एकूणच संपूर्ण शहरात राममय वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.