खानापुरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी
मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न, मंडप उभारणी कामास वेग, बाजारात खरेदीसाठी गर्दी
खानापूर : गणेशचतुर्थी अवघ्या चार दिवसांवर आल्याने खानापूर शहर परिसरात गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे. तर मूर्तिकार गणेशमूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरविण्याच्या कामात व्यग्र असून रात्रभर काम करून मूर्ती पूर्ण करण्याच्या कामात आहेत. बाजारात गणपतीच्या सणाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. उद्योग व्यवसायासाठी बाहेरगावी असलेले लोक सणासाठी गावाकडे येत आहेत. यामुळे प्रत्येक बस व खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. शहरात सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणीच्या कामात गुंतलेले आहेत. मंडप उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आले असून काही मंडळांनी गल्लीतील विद्युतरोषणाईचे काम पूर्ण केले आहे. यावर्षी सर्वच मंडळांनी मोठ्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
उंदरीसाठी बकरी बाजारात तीन ते चार कोटीची उलाढाल
तालुक्यात चतुर्थीच्या दुसरे दिवशी उंदरी सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मांसाहार करण्याची प्रथा आहे. रविवारी खानापूर येथील बकरी बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड आणि बकऱ्यांची खरेदी झाली असून तीन ते चार कोटीची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारात पालव्यापेक्षा मेंढ्यांचीच अधिक मागणी दिसून येत होती. खानापुरातील काही ठेकेदारांनी गोकाक, चिकोडी, बैलहोंगल, गदग भागातून मोठ्या प्रमाणात बकरी विक्रीसाठी आणली होती. रविवारच्या बाजारात एका मेंढ्याची किंमत 20 ते 30 हजारपर्यंत होती. शिवाय सरासरी आठ ते पंधरा हजार रकमेच्या बकऱ्यांच्या खरेदीकडे लोकांचा कल दिसून येत होता. रविवारच्या बाजारात जवळपास तीन ते चार कोटीच्या वर आर्थिक उलाढाल झाल्याचे ठेकेदारांनी सांगितले. शिवाय मंगळवारी बागेवाडी तर बुधवारी नंदगड बाजारात बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असल्याचे बोलले जात आहे.