Satara News : खटाव तालुक्यात मनुष्यासह मुक्या जीवांच्या वेदना दूर करण्याच्या उपक्रमाचे होतेय कौतुकै
वडूज आणि नढवळ येथे मानवतावादी शिबिरांचे यशस्वी आयोजन
वडूज : खटाव तालुक्यातील नढवळ येथील गुरुभक्त तात्यासाहेब माने यांचे स्मरणार्थ नढवळ येथे सर्वरोग निदान तर वडूज येथे पशुचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने मनुष्यासह मुक्या जीवांच्या वेदना जाणवून घेतल्याबद्दल माने परिवार व संयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पहिल्या दिवशी वडूज येथे झालेल्या पशुरोग निदान शिबीरात सुमारे १५० श्वानांचे लसीकरण, ७० शस्त्रक्रिया तसेच गाई म्हैस यांची तपासणी व उपचार करण्यात आले. तर नढवळ येथे झालेल्या सर्वरोग निदान शिबिरात १५० इसीजी, १२९ चस्मे वाटप तर २०० रुग्णांची डोळे तपासणी करण्यात आले. १६० नुरोप्याथी तपासणी, कॅल्शियम तपासणी १५०, कोलेस्ट्रॉल लीपिड प्रोफाइल १२५, शुगर १५०, रक्त तपासणी १५० रुग्णांची करण्यात आली.
या मानवतावादी उपक्रमांचे कर्नाटकचे महालेखापाल जहांगीर इनामदार, मुंबईचे पशु उपआयुक्त डॉ. गजेंद्र खांडेकर, पशुसंवर्धन उपआयुक्त दिनकर बोर्डे, डॉ. विकास वासकर प्राचार्य, शिरवळ, डॉ. बी. जी. होळ, डॉ. विजय सावंत, डॉ. लोखंडे, डॉ. सोमनाथ गावडे आदींनी कौतुक केले.तर पांडुरंग महाराज रसाळ यांनी कीर्तनात बोलताना म्हणाले, मनुष्याचे सर्वात प्रेम स्वतःच्या जीवावर असते. तो जीव ज्याच्यामुळे सुखरूप आहे. त्या परमेश्वराबद्दल मनुष्याने कायम कृतज्ञ रहावे. प्रा. बंडा गोडसे यांचेही मनोगत झाले. डॉ. मनोज माने, डॉ. श्रीनिवास माने यांनी स्वागत केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाई प्रांताचे उपजिल्हाधिकारी डॉ. योगेश खरमाटे, उपजिल्हाधिकारी अमर रसाळ, निवृत्त अति. मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, निवृत्त तहसीलदार एम. के. बेबले, धनगर महासंघाचे अध्यक्ष प्रविण काकडे, नगरसेवक ओंकार चव्हाण, डॉ. केशव काळे, डॉ. चव्हाण डॉ. खरजे, डॉ. महेश माने, ए. टी. काळे, डॉ. प्रमोद गावडे, डॉ. विवेकानंद माने, अभियंता तुकाराम बरकडे, विजयराव काळे यांच्या सह शेकडो मान्यवर उपस्थित होते. यावेळी निष्ठावंत पुरस्काराबद्दल पांडुरंग गोफने यांचा सन्मान करण्यात आला.