85 वर्षीय वृद्धावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया
बेळगाव : हृदयरोगाने ग्रस्त 85 वर्षीय वृद्धावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. केएलई हॉस्पिटलमधील हृदय शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करून रुग्णाला नवजीवन दिले. रुग्णाने उपचाराला प्रतिसाद दिल्याने त्याला अवघ्या सात दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. सदर रुग्ण मुडलगी तालुक्यातील कुलगोड येथील रहिवासी असून मद्रास रेजिमेंटचे निवृत्त कॅप्टन आहेत. डॉ. दर्शन डी. एस. व त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सदर रुग्णाला केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची अँजिओग्राफी केली असता त्यांच्या धमण्या कमकुवत असल्याचे आढळून आले. तसेच हृदयही कमकुवत होते. यातच सदर रुग्ण वयोवृद्ध असल्याने धोका पत्करणे जोखमीचे होते. मात्र चर्चेअंती डॉ. दर्शन यांनी सदर रुग्णावर जटील असलेली शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. पारिश्वनाथ पाटील, डॉ. रणजित नायक, डॉ. शरणगौडा पाटील व पथकाने ही शस्त्रक्रिया केली. संस्थेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकाचे कौतुक केले.