परप्लेक्सिटी एआय सर्च इंजिनचा निर्माता श्रीनिवासची यशोगाथा
आजच्या डिजिटल युगात रोजच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा ट्रेंड दिसून येतो. एका भारतीय युवकाने आपल्या अपार जिद्दीने आणि मेहनतीने आपल्याकडे लक्ष्य वेधून घेतले आहे. गूगल सारख्या बड्या कंपनीतील आपली नोकरी सोडून अरविंद श्रीनिवास यांनी आपले स्वत:चे ‘सर्च इंजिन’ ज्याचे नाव ‘परप्लेक्सिटी एआय’ हे सुरु केले. आज त्याच्या या कंपनीने करोडो डॉलर्सचा अल्पावधीत मोठा पल्ला गाठला आहे. अरविंद श्रीनिवास यांची ही कहानी देशातील प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग अफाट आहे. अमेरिका आणि चीन यांचे या क्षेत्रातील ‘बौद्धिक संपदा’ कायदेशीररित्या सुरक्षित करून घेण्याबाबतीत जागतिक वर्चस्व आहे. अशा या आव्हानात्मक क्षेत्रात अरविंद श्रीनिवास यांची यशोगाथा तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळे काही करून दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी खूपच प्रेरणादायी निश्चितच आहे. अरविंद श्रीनिवास यांनी वयाच्या 31 व्या वर्षी हे गौरवास्पद यश प्राप्त केले आहे. 1994 चा त्यांचा जन्म. चेन्नईमध्ये बालपण गेले. त्यांच्या आईची इच्छा होती की अरविंद श्रीनिवासने आयआयटीमध्ये आपले शिक्षण घ्यावे. अरविंद श्रीनिवास यांनी बी. टेक म्हणजेच पदवीचे शिक्षण आणि एम. टेक. म्हणजेच पदव्य़ुत्तर शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास या राष्ट्रीय मानांकित संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेतून पूर्ण केले. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, अमेरिका येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच. डी प्राप्त केली. यावेळी केलेल्या संशोधनामुळे ते एआय तसेच डीप लर्निंग या अत्यंत गहन आणि किचकट विषयात प्राविण्य प्राप्त केले. ओपन एआय या कंपनीत त्यांनी रिसर्च इंटर्नशिप केली. नंतर गूगल कंपनीतही ‘रिसर्च इंटर्न’ म्हणून काम केले.
2022 मध्ये अरविंदने डेनिस यारेट्स,
जॉनी हो आणि अँडी कौनविस्की यांनी मिळून ‘परप्लेक्सिटी एआय’ या ‘स्टार्ट अप’ची सुरुवात केली. प्रथमपासूनच स्वत: वेगळे असे काही तरी निर्माण करायचेच ही दुर्दम्य इच्छा त्यांची होती. त्यामुळेच गूगलमधील चांगली नोकरी सोडून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ‘परप्लेक्सिटी एआय’ या स्टार्टअपची सुरुवात केली. आपण असे सर्च इंजिन बनवायचे की आहे त्या गूगल आणि चॅट जीपीटी पेक्षाही ते अधिक वेगळे आणि उपयुक्त असेल व ते त्यांनी जिद्दीने करून दाखवले. आज ते या कंपनीचे चीफ एक्सिक्युटीव्ह ऑफिसर आणि सहसंस्थापक या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. अतिशय सरळ आणि उपयुक्त उत्तर हे सर्च इंजिन देऊ लागले आहे. या कंपनीत अमेझॉनच्या जेफ बेझोस जगप्रसिद्ध व्यक्ती आणि इन्व्हिडिया या जगप्रसिद्ध कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. स्मार्टफोनवर त्यांच्या सर्च इंजिनसाठी अनेक बड्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्याशी भागीदारी केलेली आहे. डेटा ब्रिक्स कंपनीने मोठी गुंतवणूक करण्याची ऑफर अरविंद श्रीनिवास यांना दिली आहे. अरविंद श्रीनिवास यांना विशेष करून ‘डीप लर्निंग’मध्ये खूपच आवड होती. म्हणून मग ‘डिप माईंड’ या कंपनीत रिसर्च इंटर्न म्हणून काम केले. तसेच गूगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या ‘पेज रँक’ या कार्यातून त्यांनी स्फूर्ती घेतली. आशिष वासवानी या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ च्या शोधकर्त्याबरोबर संशोधन करून अनेक नवी ‘डीप लर्निंग’
मॉडेल्स बनवली व ट्रान्सफॉर्मर्सची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवली. या यशस्वी संशोधनानेच श्रीनिवासन यांना ‘सर्च इंजिन’ बनवण्याची प्रेरणा मिळाली. आपण असे ‘सर्च इंजिन’ बनवायचे की त्यातून वापरकर्त्याला अतिशय जलदगतीने आणि अगदी बिनचूक व खरे उत्तर मिळेल. आणि याच ध्येयाने त्यांनी ‘परप्लेक्सिटी एआय’ हे सर्च इंजिन निर्माण केले. अरविंद यांच्या कंपनीने की-वर्ड सर्चमधून फायदा मिळवत जाहिरातीला फाटा दिला. आज या सर्च इंजिनचे 30 दशलक्ष वापरकर्ते आहेत. कंपनीचे मूल्यांकन विक्रमी एक लाख बारा हजार कोटी रुपयांवर पोहचले आहे. जागतिक स्तरावर भारतीय युवकाने घडवलेला हा एक विक्रमच आहे. ‘परप्लेक्सिटी एआय’ या सर्च इंजिनने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्यांना ‘शोध’चा अनुभव अधिक समृद्ध केला आहे. जगभरातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्या ‘एआय’वरच्या संशोधनावर अमाप पैसा खर्च करीत आहेत. अशावेळी अरविंद श्रीनिवास या भारतीय युवकाने आपल्या सर्जनशीलतेने संपूर्ण जगाचे लक्ष आकर्षित केले आहे. अरविंद यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रचंड आवड आहे. यातूनच त्यांनी ‘टेक्स्ट टू स्पीच’ आणि व्हाइस क्लोनिंग तसेच टेक्स्ट टू व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि टेक्स्ट टू म्युझिक प्लॅटफॉर्म तसेच एआय डेटा सायंटिस्टची निर्मिती आणि महत्त्वाचे म्हणजे नाविन्यपूर्ण असे ‘जनरेटिव्ह एआय हार्डवेअर’ त्यांनी क्लिस्ट गणितीय सूत्रे सोडवण्यासाठी निर्माण केले आहे. अरविंद श्रीनिवास यांची ही यशोगाथा आजच्या तरुणाईसाठी खूपच प्रेरणादायी आहे.
शालेय शिक्षण घेत असताना त्यांना नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप प्राप्त झाली होती. त्यानंतर ‘इंडियन नॅशनल ऑलिंपियाड’ मध्ये त्यांना अवॉर्ड मिळाले होते. 2015मध्ये त्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ने फेलोशिप दिली होती. चॅट जीपीटीची निर्मिती करणारा जॉन शुलमन याने श्रीनिवास यांच्या हुशारीचे कौतुक करून त्यांना आपल्या ‘ओपन एआय’या कंपनीत संशोधनाची पहिली संधी दिली. अरविंद यांच्या मते, तरुणांनी सोशल मीडियावर आपला वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा त्यांच्या मते ‘एआय टूल्स’ शिकण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे तरच त्यांना आपल्या नोकऱ्या शाबूत राखता येतील ‘टेक आयकॉन’ म्हणून त्यांची ओळख आता जगासमोर झाली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या नवनिर्मितीवर कमी भर देतात. त्यामुळेच पारंपरिक कंपन्यांमध्ये रुटीन काम करा, काही प्रोजेक्ट्स करा यातच समाधान मानले जाते. काही वर्षानंतर आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरपूर पैसे कमवायला आलो होतो की तंत्रज्ञान नवनिर्मितीसाठी आलो होतो, याचे भानच विसरले जाते. अगदी दोन वर्षाच्या अल्पावधीत अरविंद यांनी ‘आयडिया टू मल्टि बिलियन डॉलर कंपनी’ असा थक्क करणारा प्रवास करून दाखवला आहे.
-प्रा. डॉ. गिरीश नाईक