For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घनदाट जंगलात जिद्दीने फुलवला ऊसाचा मळा! गगनबावड्यातील धनगरवाड्यातील शेतकऱ्याची किमया

12:52 PM Dec 12, 2023 IST | Abhijeet Khandekar
घनदाट जंगलात जिद्दीने फुलवला ऊसाचा मळा  गगनबावड्यातील धनगरवाड्यातील शेतकऱ्याची किमया
Success Story Mhasurli Keel
Advertisement

युवराज भित्तम / म्हासुर्ली

सह्याद्रीच्या दुर्गम डोंगर रांगेत चार ही दिशांना असलेल घनदाट जंगल... जंगली हिंस्र प्राण्यांच्या वावरां बरोबरच गवारेडे व माकडांचा नित्याचा उपद्रव... पावसाळ्यात कोसळणारा धुवांधार पाऊस आणि दाट धुके....अशा बिकट परिस्थितीशी सामना करत धामणी खोऱ्यातील डोंगर माथ्यावरील ऐतिहासिक किलचा पठाराच्या पायथ्याला असलेल्या बावेली पैकी किलचा धनगरवाडा (ता.गगनबावडा) येथील तरुण शेतकरी खंडू पंडित बाजारी यांनी जिद्दीला मेहनतीची जोड देत ऊस शेती फुलवली आहे.पाच एकर लाल मातीच्या शेत जमिनीत गुंठ्याला सरासरी सव्वा टनाने उत्पादन घेत सुमारे २५० टन ऊस उत्पादन घेतले आहे.

Advertisement

राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात विस्तारलेला धामणी खोरा दाजीपूर अभयारण्यलगत असून नैसर्गिक जंगलांनी व्यापलेला आहे.तर या परिसरात पावसाळ्यात हजारो मिलिमीटर धुवांधार पाऊस कोसळत असतो.मात्र पाणी अडविण्यासाठी प्रकल्पाची पूर्तता नसल्याने स्वातंत्र्य काळापासून धामणी खोरा पाणीटंचाईने ग्रासलेला आहे.

परिणामी खोऱ्यातील नदीच्या काठावरील शेतकरी पाण्यासाठी नदीवर मातीचे बंधारे घालून पाणीसाठा करून शेती पिकवतात.मात्र याच दुर्गम खोऱ्यातील उंच डोंगर माथ्यावर वसलेल्या किलचा पठाराच्या लगत असलेल्या धनगर वाड्यावरील तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील विहीर व बोरवेल वरील उपलब्ध पाण्यावर उसासारखे नगदी घेत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Advertisement

किलचा धनगर वाड्याच्या चारही बाजूने घनदाट जंगल असून राधानगरी व गगनबावडा तालुक्याच्या सिमेवर वसला असून तीन कुंटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या सर्वांचा प्रमुख व्यवसाय शेती असून या ठिकाणी जाण्यास आजही पक्का रस्ता नाही. १९९३ मध्ये खंडू बाजारी यांचे वडील पंडित बाजारी यांनी पहिल्यांदा या धनगर वाड्यावर उसाची लागण केली. मात्र ऊस पिकातील अधिक ज्ञान नसल्याने त्याला पहिल्यांदा एवढे यश आले नाही. मात्र खंडू यांनी धामोड (ता.राधानगरी) येथील सह्याद्री हायस्कूलमध्ये दहावीचे शिक्षण घेऊन घरी परतल्यानंतर १९९७ पासून शेती व्यवसायात झोकून दिले.

ऊस पिका बाबत खंडू बाजारी यांना विचारले असता ते म्हणाले की, शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोलवर दोन तीन वेळा उभी आडवी नांगरणी केली जाते.त्यानंतर घरातील बैलाच्या औताने चार फुटाची सरी सोडून उसाची लागण केली जाते.तसेच जनावरांचे शेणखत व बकऱ्यांची लेंडी खत याचा पुरेपूर वापर केल्याने शेताची सुपीकता वाढण्यास मदत झाली असून उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापनामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

खत व पाण्याचे योग्य व्यवस्थापन..!
खत आणि पाण्याच्या व्यवस्थापना बद्दल बोलताना ते म्हणाले की शेताची मशागत करताना बाजारात उपलब्ध असलेले कोणत्याही प्रकारचे महागडे रासायनिक टॉनिकची फवारणी केली जात नाही. मात्र ऊस लागण पिकास दोन वेळा तर खोडवा ऊस पिकास एक वेळ सुफला युरिया व सुफला दाणेदार खते दिली जातात.तण व्यवस्थापनासाठी कोणत्याही प्रकारची तणनाशके नवापरता स्वतः व पत्नी तसेच वडील शेताची राबून ऊस भांगलण करून तण काढत असल्याचे बाजारी यांनी सांगितले. तसेच पाणी व्यवस्थापनासाठी घराजवळ ७२ हजार लिटरचा आयताकृती हौद बांधला असून विहिरीतील पाणी डिजेल इंजिनच्या साह्याने व घराजवळील बोरवेलचे पाणी हौदा मध्ये आणून सोडले आहे. व तेथून थेट पाईप लाईनव्दारे प्रत्येक वाफ्यामध्ये पाणी पुरवठ्याासाठी कनेक्शन देण्यात आली आहेत. मात्र पिकाला पाणी देताना अतिरिक्तत पाणी न देता गरजेनुसारच दिलेे जात असल्याचे बाजारी यांनी सांगितले.

२७ पेरा पर्यत ऊसाची उंची..!
बाजारी सांगतात की, किलचा परिसरातील दाट धुके व मुसळधार पाऊस जास्त असल्याने काही पारंपारिक ऊस बेणे येथे टिकत नाही.त्याची कूजण्याची प्रक्रिया होऊन योग्य वाढ होत नाही.परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. यावर पर्याय म्हणून पाऊस व धुके यात तग धरून राहणारी ८०११ व ८६०३२ जातीच्या ऊस बियाण्यांची लागवड केली जाते.आतापर्यंत या ऊस पिकातून चांगले उत्पादन मिळत असून २७ पेरा पर्यंत उसाची उंची गेली असून सुमारे २५० टनाचे उत्पादन झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

पीक रक्षणास तार कुंपण व दगडी गडगे...!
शेतीला चारही बाजूनी पूर्णतः जंगलाने वेढले असून गवा रेडे, रानडुक्कर व माकड त्यांचा त्रास ठरलेला आहे.यापासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेताला सर्व बाजूनी तारेचे कुंपण व दगडी गडगे घालून बंदिस्त केले आहे.त्याच बरोबर रात्रभर जागून मचाणावर बसून पहारा दिला जातो.

Advertisement
Tags :

.