समुद्रात बुडणाऱ्या बालकाला वाचविण्यात यश
भटकळ तालुक्यातील तलगोड समुद्र किनाऱ्यावरील घटना
कारवार : गणपती विसर्जनावेळी समुद्र लाटेच्या तावडीत सापडून वाहून जाणाऱ्या 14 वर्षीय बालकाला वाचविण्यात किनारपट्टी सुरक्षादलाच्या जवानांना यश आले आहे. ही घटना सोमवारी भटकळ तालुक्यातील तलगोड समुद्र किनाऱ्यावर घडली. वाचविण्यात आलेल्या बालकाचे नाव समर्थ श्रीधर खारवी असे आहे. तलगोड येथील नागरिक दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी समुद्र किनारी जमा झाले होते. विसर्जन सुरू असताना समर्थ लाटेच्या तावडीत सापडला व लाटेबरोबर वाहून जावू लागला. त्यावेळी सेवेवर तैनात असलेल्या किनारपट्टी सुरक्षा दलाचे सीपीआय कुसुमाधर के. यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी राघवेंद्र नाईक, सचिव खारवी यांनी समुद्रात उडी घेऊन त्याला वाचविले. त्यानंतर तातडीने भटकळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
विसर्जनस्थळी बंदोबस्त वाढवा
जिल्ह्याला सुमारे 140 कि. मी. इतका समुद्र किनारा लाभला आहे. किनारपट्टीवर अनेक ठिकाणी गणरायांचे विसर्जन केले जाते. यावर्षी अजून सुमद्र खवळलेलाच आहे. त्यामुळे विसर्जनावेळी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता किनारपट्टीवरील विसर्जनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या शिवाय किनारपट्टीवरील तालुक्यामध्ये काळी, गंगावळी, अघनाशिनी, शरावती या नद्यांमध्येही बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. नद्यांमध्ये ज्या ठिकाण श्रींचे विसर्जन केले जाते, तेथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली जात आहे.