ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवण्यात यश
अहमदाबाद विमान दुर्घटना : मेमरी मॉड्यूल अॅक्सेस करण्यातही सफलता : अपघाताची कारणे उघड होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळवण्यात यश मिळाल्यामुळे आता लवकरच अपघाताची कारणे उघड होण्याची शक्यता आहे. ‘एएआयबी’ने (विमान अपघात तपास ब्युरो) भारतीय आणि अमेरिकन राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) तज्ञांच्या उपस्थितीत डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. तपास वेळेवर आणि आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केला जात असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. बॉक्समधील डेटा डाउनलोड करण्यात आला आहे. तसेच मेमरी मॉड्यूलचा अॅक्सेस देखील मिळवण्यात आला आहे.
आता तपास संस्था ब्लॅक बॉक्समधून जप्त केलेल्या डेटाचे विश्लेषण करेल. यामुळे अपघाताची कारणे उघड होतील, असे गुरुवारी एका सरकारी निवेदनात स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी 24 जून रोजी नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी ब्लॅक बॉक्स तपासासाठी परदेशात पाठवला जाणार नसून त्याची चौकशी ‘एएआयबी’कडून केली जात असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी काही माध्यमांनी ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी अमेरिकेला पाठवला जाईल, असे म्हटले होते. परंतु नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी ब्लॅक बॉक्स भारतातच आहे आणि ‘एएआयबी’ त्याची चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले होते.
डाउनलोड केलेल्या डेटाचे विश्लेषण
एएआयबी आता डाउनलोड केलेल्या डेटाचे विश्लेषण करत आहे. या डेटामध्ये कॉकपिट संभाषणे आणि उ•ाणातील तांत्रिक पॅरामीटर्सचा समावेश आहे. या डेटामुळे इंजिनमधील बिघाड, फ्लॅप्स किंवा लँडिंग गियर समस्या समजून घेण्यास मदत होईल. अपघाताची नेमकी कारणे शोधताना ब्लॅक बॉक्सची मोठी मदत होणार आहे. डेटा विश्लेषणासाठी काही दिवसांपासून ते अनेक महिनेही लागू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारच्या मते, दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानातून दोन ब्लॅक बॉक्स (सीव्हीआर आणि डीएफडीआर) सेट सापडले आहेत. हे अपघाताच्या वेळी वैमानिकांचे संभाषण आणि विमानाची तांत्रिक माहिती रेकॉर्ड करतील. पहिला सेट 13 जून रोजी आणि दुसरा 16 जून रोजी सापडला होता. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान एआय-171 टेकऑफ केल्यानंतर लगेचच कोसळले होते. त्यात 241 जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी वाचला. या घटनेत एकूण 270 जणांचा मृत्यू झाला.
ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवलेले एक छोटे उपकरण आहे. ते उ•ाणादरम्यान विमानाची तांत्रिक आणि आवाजाशी संबंधित माहिती रेकॉर्ड करते. ब्लॅक बॉक्स दोन मुख्य रेकॉर्डरने बनलेला आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर वैमानिकांचे संभाषण रेकॉर्ड करतो. त्याचवेळी फ्लाईट डेटा रिकव्हरी वेग, उंची, इंजिनची कार्यक्षमता रेकॉर्ड यासारखी विमानाची तांत्रिक माहितीही पुरवते.