प्रादेशिक वन कार्यालय राधानगरीतच...राधानगरी वनहक्क समितीच्या लढ्याला यश
खासदार महाडिक यांच्या माध्यमातून प्रयत्न, प्रादेशिक वन कार्यालय स्थलांतरचा निर्णय मागे
राधानगरी प्रतिनिधी
राधानगरी येथील प्रादेशिक वन विभागाचे कार्यालय स्थलांतर करू नये, या मागणीसाठी राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समितीने टाळेठोक आंदोलनाचा इशारा दिला होता. बुधवारी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या उपस्थितीत राधानगरी येथे आंदोलकांबरोबर चर्चा झाली. त्यानंतर प्रादेशिक वन कार्यालय स्थलांतरणाचा निर्णय मागे घेत असल्याचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी स्पष्ट केले.
राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समितीने राधानगरी येथील प्रादेशिक वन विभागाचे कार्यालय अन्यत्र हलवू नये, यासाठी गेली सहा महिने निवेदन, बैठका घेऊन यासंदर्भात आवाज उठवला होता. स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर बुधवारी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. उपवनसंरक्षक जी गुरूप्रसाद यांनी राधानगरी प्रादेशिक कार्यालयात बैठक घेतली. तसेच आंदोलकांबरोबर सकारात्मक चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी या कार्यालयाच्या ठिकाणी साडेसात गुंठे जागा आहे. नवीन कार्यालयाला ही जागा पुरेशी असल्याचे दाखवून दिले.
जी गुरुप्रसाद यांनी आंदोलकांसह जागेची पाहणी करत ही जागा कार्यालयासाठी पुरेशी आहे पण कर्मचारी निवासस्थानासाठी अपुरी असल्याचे कारण पुढे केले. जुनी इमारत पाडून याचं ठिकाणी नवीन इमारत बांधणार असल्याचे सांगून कार्यालय स्थलांतराला पूर्णविराम दिला. गेल्याच आठवड्यात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी उपवनसंरक्षक जी गुरूप्रसाद यांची भेट घेऊन यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढावा, अशी मागणी केली होती, या दृष्टीने प्रयत्न केले होते.
यावेळी समितीचे निमंत्रक प्रा. पी. एस. पाटील, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुहास निंबाळकर यांनी अधिकारी, कर्मचारी निवासस्थानी राहत नाहीत. रहिवाशी भत्ता व सोयीसाठी शासनाची दिशाभूल करत असल्याचे वास्तव मांडले.
यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे, विजय महाडिक, रमेश पाटील (बचाटे), विक्रम पालकर, रमेश राणे, विजय महाडिक, दीपक शेट्टी, संतोष पाटील, तानाजी चौगले, विश्वास राऊत, बशीर राऊत यांच्यासह आठ ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.