बासमती तांदळाच्या निर्यातीतले यश
भारतात तांदळाच्या अनेक जाती पाहायला मिळतात. भात हे अनेकांचे मुख्य अन्न. भात खाण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक पाहायला मिळते. विविध जातीत बासमती तांदळाची बातच न्यारी म्हणायला हवी. सुगंधीत अशा या तांदळाला भारतातच मागणी असते असे नाही तर जागतिक स्तरावरही बासमती तांदळाने आपला सुगंध सर्वदूर पसरवला आहे. इराक, इराण, संयुक्त अरब अमिरात व इतर जवळपास 154 देशांमध्ये भारतात पिकवलेला बासमती तांदूळ आवर्जून खाल्ला जातो. या तांदळाने 2024-25 आर्थिक वर्षात निर्यातीत आपला वाटा वाढवण्यात यश मिळवलं आहे.
जागतिक स्तरावर पाहता बासमती तांदळाची निर्यात ही 2024-25 आर्थिक वर्षांमध्ये चांगली झालेली दिसून आली. 2024-25 मध्ये तांदळाच्या निर्यातीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 15 टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. ही उपलब्धी भारतीय कृषी क्षेत्रासाठीसुद्धा महत्त्वाची मानली जात आहे. डीजीसीआयएस (डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टीक्स) यांच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जगभरात भारताच्या बासमती तांदळाला चांगली मागणी दिसून आली. या आर्थिक वर्षामध्ये 50 हजार 315 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची एकंदर निर्यात करण्यात आली आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2023-24 मध्ये 48,389 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात जगभरामध्ये केली गेली होती. यामध्ये इराक, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन यासारख्या इतर देशांचा समावेश आहे.
किती झाली निर्यात
मागच्या आर्थिक वर्षी एकंदर पाहता 52.42 लाख मेट्रिक टन बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली होती. यावर्षी पाहता तांदळाच्या निर्यातीमध्ये 15.7 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये बासमती तांदळाची निर्यात ही 60.65 लाख मेट्रिक टन इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचलेली आहे. हे निर्यातीतले यश नक्कीच स्पृहणीय आहे. तांदळाच्या उत्पादनात भारताने यंदा केलेल्या वाढीचा फायदा दृष्टीपथात येताना दिसतो आहे. मध्य आशिया आणि पश्चिम आशिया या देशांमध्ये बासमती तांदळाला मागणी अधिक दिसून आली आहे.
कोणत्या देशात निर्यात
बासमती तांदळाची सर्वाधिक मागणी ही सऊदी अरब हाच देश सर्वाधिक नोंदवत आला आहे. देशाने जवळपास 10,190 कोटी रुपयांच्या मूल्यांचे बासमती तांदूळ भारताकडून खरेदी केले आहेत. यानंतर देशांचा विचार केल्यास इराक, इराण, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका यांच्याकडून बासमती तांदळाची आयात करण्यात आली आहे. आयातीचा विचार केल्यास इराकने 7201 कोटी रुपये, इराणने 6374 कोटी रुपये, संयुक्त अरब अमिरातने 3089 कोटी रुपये व अमेरिकेने 2849 कोटी रुपये मूल्याचे बासमती तांदूळ भारताकडून आयात केले आहेत.
अडथळ्यानंतर निर्यात सुरु
इराण आणि इस्राइल यांच्यामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्याला तांदळाच्या निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काही अंशी तांदळाच्या वाहतुकीबाबत अडचणी जाणवू लागल्या होत्या. गुजरातमधील कांडला आणि मुंदरा या बंदरातून तांदळाची पाठवणी होते. इराण आणि इस्राइल यांच्यादरम्यान युद्ध बंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर तांदळाच्या निर्यातीला पुन्हा सुरुवात झाली आहे. मागच्या आर्थिक वर्षांमध्ये भारताने जवळपास 150 देशांना बासमती तांदळाची निर्यात केली होती. या आर्थिक वर्षांमध्ये भारताने यामध्ये आणखी चार नव्या देशांची भर घातली आहे. आता भारताने यायोगे तांदळाची निर्यात एकंदर 154 देशांना केली आहे.
तांदूळ उत्पादनात बंगालच सरस
विविध राज्यांमध्ये तांदळाचे उत्पादन पाहता यात बाजी मारली आहे ती पश्चिम बंगालने. अंदाजे तेथे वार्षिक 15 दशलक्ष मेट्रीक टन इतके उत्पादन घेतले जाते. यानंतर नंबर लागतो तो 14 दशलक्ष मेट्रीक टन उत्पादनासह उत्तर प्रदेश राज्याचा. यानंतर पंजाब (12 दशलक्ष मेट्रीक टन), आंध्र प्रदेश (11 दशलक्ष मेट्रीक टन) आणि तेलंगाणा (7.5 दशलक्ष मेट्रीक टन) यांचा नंबर लागतो. यासोबत बिहारमध्ये 7 दशलक्ष मेट्रीक टन तर तामिळनाडूत 5 दशलक्ष मेट्रीक टन इतक्या तांदळाचे वार्षिक उत्पादन घेतले जाते.
हे देशही करतात उत्पादन
तांदळाच्या उत्पादनात आशियातले देश आघाडीवर आहेत. भारत आणि चीन हे दोन देश महत्त्वाचे योगदान देत आहेत. चीन हा तांदळाच्या उत्पादनात अव्वल देश आहे. नंतर अर्थातच भारत. यासोबत इंडोनेशिया, बांगलादेश, व्हिएतनाम व थायलंड या देशांकडूनही तांदळाचे उत्पादन घेत जागतिक तांदळाची मागणी पूर्ण केली जात आहे. यानंतर म्यानमार, फिलीपीन्स व पाकिस्तानाही तांदळाचे उत्पादन घेतले जाते. याव्यतिरीक्त बिगर आशियाई देशांमध्ये ब्राझील हा 10 आघाडीवरच्या देशात आहे.
-दीपक कश्यप