हडफडेत एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात यश
हणजूण पोलिसांची 12 तासांच्या आत यशस्वी कामगिरी
म्हापसा : हडफडे येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम गॅसकटरच्या साहाय्याने फोडून चोरट्यांनी 4.62 लाख ऊपयांची रक्कम लंपास केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत अब्दूल ऊस्तम हक (37 वर्षे) आणि मिजानूर मुल्ला (45 वर्षे, दोघेही रा. मूळ दिल्ली व बांगलादेशी रहिवासी) या अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. हल्लीच जुने गोवे येथे झालेल्या चोरीतही त्यांचा हात होता अशी माहिती उघडकीस आली आहे. हणजूण पोलिसस्थानकाचे निरीक्षक सूरज गांवस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
अब्दूल ऊस्तम हा अट्टल चोर असून गोव्यातील अनेक एटीएम फोडण्यात त्याचा हात आहे. अलीकडेच जुने गोवे येथे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना त्याला लोकांनी पकडून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याची हल्लीच जामिनावर सुटका झाली होती. हडफडेत चोरीची घटना शनिवारी पहाटे 5 वा.च्या दरम्यान उघडकीस आली. एटीएम मशीन फोडून 4 लाख 62 हजार ऊपये लंपास केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक सौरभ भदौरी यांनी हणजूण पोलिसस्थानकात केली होती. त्या आधारे हणजूण पोलीस निरीक्षक सूरज गांवस व पोलीस पथकाने अवघ्या 12 तासांच्या आत चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले.