For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात भरघोस वाढ

06:45 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरपंच  उपसरपंचांच्या मानधनात भरघोस वाढ
Advertisement

- दुप्पट मानधन वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी- गाय दुधास प्रतिलिटर 7 रुपये अनुदान

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 24 मोठ्या निर्णयांची घोषण करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी करण्यात आले आहे, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी यासह गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यातील सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या निर्णयासह लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार दरमहा 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार ऊपये  इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना दरमहा 2 हजार, 3 हजार आणि 4 हजार ऊपये इतके मानधन मिळेल. सध्या सरपंचांना 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार ऊपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना 1 हजार, 1500 आणि 2 हजार ऊपये मानधन मिळते.

कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश

राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आज मंत्रीमंडळाने तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ति. कुणबी या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या ‘इतर मागासवर्ग’ यादीतील अ.क्र.83 मध्ये समावेश करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. आयोगाच्या शिफारसीनुसार या पोटजातींचा कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यापुढे समावेश होईल.

ग्रामसेवक नव्हे ग्रामपंचायत अधिकारी

राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज मान्यता देण्यात आली. ग्रामसेवक (एस 8) व ग्रामविकास अधिकारी (एस 12) ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25,500 ते 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून याचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल.

गाय दुधासाठी सात रुपये अनुदान

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात ऊपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यात येईल. मात्र आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी 965 कोटी 24 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ

ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास  मान्यता देण्यात आली. या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक, युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल. या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल तसेच याचे मुख्यालय पुणे येथे राहील.

 राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण

राज्यातील 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे नाव कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड, औ. प्र. संस्था  जामखेड जि. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड जि. अहमदनगर, औ. प्र. संस्था मुंबई शहरचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था येवला जि. नाशिकचे नाव महात्मा ज्योतिबा फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था जव्हार जि. पालघरचे नाव भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था कोल्हापूरचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था अमरावतीचे नाव संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था सांगलीचे नाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांवचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था आर्वी जि. वर्धाचे नाव दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था बेलापूर नवी मुंबईचे नाव दि. बा. पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था कुर्लाचे नाव महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. संस्था भूम जि. धाराशिवचे नाव आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ. प्र. ठाणेचे नाव धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे होणार आहे.

Advertisement
Tags :

.