घरगुती सिलिंडरवर अनुदान, महिलांना 2,500 रुपये
दिल्लीत भाजपचे संकल्पपत्र जारी : होळी-दिवाळीला एक सिलिंडर मोफत देण्याचीही घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी पक्षाचा संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या संकल्पपत्राचे वर्णन ‘विकसित दिल्लीचा पाया’ असे केले आहे. भाजपने दिल्लीतील महिला समृद्धी योजनेंतर्गत भगिनींना दरमहा 2,500 रुपये आणि गरीब महिलांना सिलिंडरवर 500 रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले. तसेच होळी आणि दिवाळीला एक सिलिंडर मोफत देण्याची घोषणाही संकल्पपत्रात करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीसह भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सर्व पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली असून उमेदवारी अर्ज दाखल होण्यासही प्रारंभ झाला आहे. याचदरम्यान शुक्रवारी भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले. या संकल्पपत्रात मतदारांना आकर्षित करणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
भाजपच्या संकल्पपत्रात अनेक आर्थिक आमिषे दाखविण्यात आली आहेत. जाहीरनाम्यातील घोषणेनुसार, मातृ सुरक्षा वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 21,000 रुपये दिले जातील. तसेच 6 पोषण किटदेखील दिल्या जातील. दिल्लीत वीज, बस आणि पाण्याबाबत सध्याच्या सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजना सुरूच राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्लीत भाजपची सत्ता आल्यानंतर 60-70 वर्षे वयोगटातील वृद्धांना दिली जाणारी पेन्शन 2000 रुपयांवरून 2,500 रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे. तर, 70 वर्षांवरील विधवा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये पेन्शन मिळेल, असे जे. पी. न•ा यांनी जाहीर केले आहे. त्याव्यतिरिक्त अटल कॅन्टीन योजनेअंतर्गत, दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये गरिबांना पाच रुपयांत पौष्टिक अन्न दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या जाहीरनाम्याला ‘खोट्या घोषणांचा वर्षाव’ असे म्हटले आहे. म्हणाले- कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यावर त्यात एकही ओळ नव्हती.
जनतेकडून मागवल्या होत्या सूचना
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी भाजपने जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. या आवाहनानुसार पक्षाला 40,000 हून अधिक सूचना मिळाल्या. सूचना गोळा करण्यासाठी पक्षाने व्हिडिओ व्हॅन मोहीम सुरू केली. यामध्ये सुमारे 60,754 सूचना मिळाल्या. याशिवाय, सोशल मीडियाद्वारे 40,000 हून अधिक सूचना देखील प्राप्त झाल्या होत्या. यातील निवडक सूचनांना संकल्पपत्रात स्थान देण्यात आले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे
- समृद्धी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रु.
- एलपीजी सिलिंडरवर 500 रुपयांची सबसिडी
- गर्भवती महिलांना 21,000 रुपयांची मदत
- होळी आणि दिवाळीला एक सिलिंडर मोफत
- आयुष्मान भारत दिल्लीत राबविण्यात येईल
- पाच लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आरोग्य विमा
- ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये पेन्शन
- दिल्लीत अटल कॅन्टीन योजना सुरू करणार