इलेक्ट्रिक वाहनांना दिल्लीत अनुदान
आतिशी यांच्या नेतृत्त्वातील सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आतिशी यांच्या नेतृत्त्वातील दिल्ली मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनांना सरकारतर्फे अनुदान म्हणजेच सबसिडी देण्याला मंजुरी दिली आहे. दिल्ली ईव्ही धोरणाचा कालावधी मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याचे आतिशी यांनी स्पष्ट केले. 1 जानेवारी 2024 रोजी आणि त्यानंतर खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्यासोबतच रोड टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. तसेच गुरुनानक आय सेंटरमध्ये ऑप्टोमेट्री प्रशिक्षण विंग सुरू करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. येथे 4 वर्षांचा बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयांबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत 24 तास वीज, चांगल्या शाळा, मोहल्ला क्लिनिक, ईव्ही पॉलिसी, घरोघरी वितरण यांसारखी क्रांतिकारी धोरणे देऊन देशभरात एक आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.