सुब्रमणियन, त्रिशा-गायत्री उपांत्यपूर्व फेरीत
अॅन्टोनसेन, बारुआ, प्रणॉय, राजावत पराभूत
वृत्तसंस्था / बेसील
2025 च्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या शंकर सुब्रमणीयनने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित अॅन्टोनसेनला पराभवाचा धक्का देत पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. प्रियांशु राजावत, प्रणॉय, बारुआ, अनुपमा उपाध्याय यांचे आव्हान मात्र समाप्त झाले.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात भारताच्या शंकर सुब्रमणीयनने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित अॅन्डर्स अॅन्टोनसेनला 18-21, 21-12, 21-5 अशा गेम्समध्ये पराभवाचा धक्का देत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. तामिळनाडूच्या 21 वर्षीय सुब्रमणीयनने 2022 च्या विश्व कनिष्टांच्या बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले होते. सुब्रमणीयनने अॅन्टोनसेनचे आव्हान 66 मिनिटांच्या कालावधीत संपुष्टात आणले. सुब्रमणीयनच्या बॅडमिंटन कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. आता सुब्रमणीयन आणि फ्रान्सचा पोपोव्ह यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. पुरुष एकेरीत आता सुब्रमणीयनच्या रुपातून भारताचे स्पर्धेतील आव्हान अद्याप जिवंत राहिले आहे. अन्य एका सामन्यात चीनच्या हेन क्वियानने इशराणी बारुआचा 21-19, 18-21, 21-18 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. फ्रान्सच्या पोपोव्हने भारताच्या राजवतचा 47 मिनिटांच्या कालावधीत 21-15, 21-17 अशा फडशा पाडत पुढील फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीमध्ये इंडोनेशियाच्या 11 व्या मानांकित पुत्री कुसुमा वेरदानीने भारताच्या अनुपमा उपाध्यायवर 21-17, 21-19 अशी मात केली. त्याचप्रमाणे महिला दुहेरीमध्ये भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना जर्मनीच्या लेमन आणि हुबेश यांचा 21-12, 21-8 अशा गेम्समध्ये फडशा पाडला. मिश्र दुहेरीमध्ये लियु हेंग आणि जेंग चे यांनी भारताच्या सतीश करुणाकरन आणि आद्या वरीयात यांच्यावर 21-14, 21-16 अशी मात केली.