बालिंगे दप्तर जळीत प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करा
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील बालिंगा ग्रा.प. क्षेत्रातील गायरान गट क्र. 267/1 मध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून 6 नागरीकांची नावे बेकायदेशीर नोंद केल्याची तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने सीईओ कार्तिकेयन एस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच ग्रा.प.मधील दप्तर जळीत प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेत ग्रा.पं.विभागाचे उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव यांनी या दोन्ही प्रकरणांची तत्काळ चौकशी करून 20 जानेवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश करवीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या निवेदनातील तक्रारीनुसार बालिंगे गायरान गट क्र. 267/1 मध्ये ग्रा.पं.चे लिपिक संतोष जाधव, तत्कालिन ग्रामसेविका स्वाती चव्हाण व ग्रामसेवक राजेंद्र भगत यांनी संगनमताने आपल्या आधिकाराचा गैरवापर करून आपल्या मित्र परिवाराची नावे गायरान दप्तरी नोंद करून कर रजिस्टरमध्येही नोंद केली आहेत. तसेच 28 एप्रिल 2023 रोजी रात्री 12.45 वाजता बालिंगे ग्रामपंचायतीचे लिपिक संतोष जाधव यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर जाळल्याबाबत गुन्हा नोंद होण्यासाठी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते. त्यानुसार योग्य ती चौकशी करून त्याचा अहवाल जि.प.कडे सादर करण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. पण गट विकास अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही चौकशी केलेली नाही.
प्रकाश माने, पिंटू फिरोज, सचिन भोसले, उत्तम पाटील, सागर कारंडे, राहुल पाटील या व्यक्तींची नावे गायरान जमिनीच्या असिसमेंट पत्रकी खुद्द म्हणून नोंद केली आहेत. ग्रामसेवक आणि लिपीकास हाताशी धरून त्यांच्याकडून या जमिनीची विक्री करून कोट्यावधी रूपयांचा जमीन घोटाळा करण्याच्या हालचाली सुरु आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर जळीत प्रकरणाचा तपास झालेला नाही असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंब्ति करावे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्यावतीने केली आहे. त्याची दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल पुराव्याच्या कागदपत्रांसह सादर करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांनी करवीरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.