पूजा खेडकरकडून दोन अपंगत्व प्रमाणपत्र सादर
दिल्ली पोलिसांचा न्यायालयात नवीन स्टेटस रिपोर्ट सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात नवीन स्थिती अहवाल (स्टेटस रिपोर्ट) दाखल केला आहे. या अहवालामध्ये निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिने दोन अपंगत्व प्रमाणपत्र सादर केली होती. त्यापैकी एक बनावट असल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी स्टेटस रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे. यूपीएससीने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता नागरी सेवा परीक्षा- 2022 आणि 2023 दरम्यान पूजा खेडकरने दोन अपंगत्व प्रमाणपत्रे सादर केल्याचे उघड झाले.
अहमदनगर वैद्यकीय प्राधिकरणाच्या नावे सादर करण्यात आलेली दोन्ही प्रमाणपत्र पोलिसांना मिळाली आहेत. सिव्हिल सर्जनच्या कार्यालयातील नोंदीनुसार, या प्राधिकरणाने अपंगत्व प्रमाणपत्र क्रमांक एमएच2610119900342407 जारी केलेले नाही. त्यामुळे एक अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्मयता आहे.
पूजाने युपीएससी निवड रद्द करण्याच्या आणि जामीनातून दिलासा न देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पटियाला हाऊस न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी पूजाला दिलासा देण्यास नकार दिला होता. यानंतर पूजाने 8 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 30 ऑगस्ट रोजी पूजाने दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर दाखल केले होते. त्याप्रसंगी युपीएससी परीक्षेत आरक्षणासाठी उमेदवाराचे 40 टक्के अपंगत्व असणे आवश्यक आहे. मी 47 टक्के अपंग असल्यामुळे केवळ अपंग श्रेणीतील माझे प्रयत्न युपीएससी परीक्षेत गणले जावेत, असे तिने म्हटले होते.