For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विषयांचा मर्यादित उपभोग घ्यावा

06:21 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
विषयांचा मर्यादित उपभोग घ्यावा
Advertisement

जन्ममृत्युचे चक्र संपुष्टात आणणे हे प्रत्यक माणसाच्या जीवनाचे ध्येय असायला हवे. त्यासाठी एक नामी युक्ती सांगताना बाप्पा म्हणाले, राजा कर्म कर आणि त्याचे फल ईश्वराला अर्पण कर म्हणजे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. हे ऐकल्यावर काही माणसे कर्म करण्याचे टाळतात परंतु कर्म न करण्याने मनुष्य निक्रिय होतो. कर्तव्यकर्म टाळून, त्यापासून पळ काढून काहीच साधत नसतं. कर्म करणे हे नैसर्गिक असल्याने मनुष्याला ते टाळता येत नाही. जो असा प्रयत्न करेल त्याच्या आळसात वाढ झाल्याने, त्याची तामसी वृत्ती वाढेल. त्याचे अध:पतन होऊन पुढील जन्म मनुष्यापेक्षा खालच्या योनीत मिळेल. म्हणून कर्म टाळून काहीच साधणार नाही, मुक्ती मिळणे तर दूरच!

Advertisement

बाप्पांच्या सांगण्यानुसार काही लोक सत्कर्म करून फलत्याग करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या हातून सत्कर्मेच घडावीत ह्यासाठी इंद्रियांनी सुचवलेल्या विषयांच्या उपभोगापासून कटाक्षाने दूर राहतात. काही काळ हे शक्य होते पण त्याच्या मनातून विषयांचे विचार काही जात नाहीत. त्यांचे प्रयत्न तर प्रामाणिक असतात परंतु आत्मज्ञान झाल्याशिवाय इंद्रिये ताब्यात येत नाहीत हे ते लक्षात घेत नाहीत. त्याला अध्यात्मात मंदबुद्धि असे म्हणतात. यातून काहीच साध्य होत नसल्याने त्याच्या अशा आचरणाला खोटा अथवा निंदास्पद आचार म्हणतात. ह्या अर्थाचा कर्मकारीन्द्रियग्रामं नियम्यास्ते स्मरन्पुमान् । तद्गोचरान्मन्दचित्तो धिगाचार स भाष्यते ।। 5।। हा श्लोक आपण सध्या पहात आहोत.

समोर एखादी आकर्षक वस्तू दिसली की, डोळ्यांना ती पहावीशी वाटणारंच. समजा तुम्ही डोळ्यांना बजावलंत की, तिकडं पाहू नका तर डोळे दुसरीकडं पाहू लागतील पण हळूच तुमची नजर त्या आकर्षक वस्तुकडं जाईल कारण डोळ्यांना जरी जबरदस्तीनं दुसरीकडं वळवलं असलं तरी मनात त्याच वस्तूचं चिंतन चालू असतं. एखादा आवडता पदार्थ बघितला की, जिभेला पाणी सुटणारच, कानांना संगीत ऐकावं असं वाटणारच, नाक सुवास घ्यायला अधीर होणारच, त्वचा एखाद्या वस्तूला स्पर्श करायला उत्सुक असणारच. हे सगळं अनावर होणार कारण मनात या गोष्टींचंच चिंतन चालू असतं आणि मनात जे चिंतन चालू असतं त्यानुरूप आज्ञा मन इंद्रियांना देत असतं. म्हणून नुसतं इंद्रियांना गप्प बसा असं म्हणून विषय संपत नाहीत. अशा पद्धतीनं म्हणजे इंद्रिय दमन करून मी इंद्रियजय साधलाय असं म्हणणारा मंदबुद्धी असतो. त्याची वर्तणूक दांभिकाप्रमाणे म्हणजे आत एक बाहेर एक अशी असते. हे टाळायचं असेल तर बळजबरीने विषयोपभोगांकडे संपूर्ण पाठ फिरवणे योग्य नसून इंद्रियांना मर्यादित प्रमाणात विषयोपभोग घेऊ द्यावेत व त्यांचा अतिरेक टाळावा.

Advertisement

बाप्पांनी अतिरेक टाळावा असं सांगितलं कारण जर बळजबरीने इंद्रियांना काबूत ठेवायचा प्रयत्न केला तर काही काळ ती गप्प बसतील पण नंतर संधी मिळताच पिसाळलेल्या जनावराप्रमाणे मनावर हल्ला करून ती त्याला जेरीला आणल्याशिवाय रहात नाहीत.

इंद्रियांवर तात्पुरता ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात मनाची विषयांचा उपभोग घ्यायची इच्छा तशीच राहून गेलेली असली तरी मनात त्यांचे चिंतन मात्र चालूच असते. त्या चिंतनाने मन आधीच कमकुवत केलेले असते. त्यात इंद्रियांनी केलेल्या हल्ल्याने ते अधिकच दीन होऊन इंद्रियांनी सुचवलेल्या विषयांचा उपभोग घेण्यास सहजी तयार होते.

म्हणून बाप्पा म्हणतात विषयांच्या उपभोगांचा अतिरेक न करता मर्यादित प्रमाणात त्यांचे उपभोग घ्यावेत. त्याचवेळी साधना चालू ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकडे वाटचाल करावी. जसजसे मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याच्या जवळ जातो तसतशी त्याची विषयातील गोडी आपोआप कमी होते आणि तो आत्मज्ञानी झाल्यावर ती पूर्णच संपते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.