मुर्डेश्वर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सेवेतून निलंबित
गैरधंदे रोखण्यात अपयश आल्याचा ठपका
कारवार : भटकळ तालुक्यातील मुर्डेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका खासगी हॉटेलमध्ये सुरू असलेले गैरधंदे रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून मुर्डेश्वर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या उपनिरीक्षकांचे नाव मंजुनाथ असे आहे. ही कारवाई कारवार जिल्हा पोलीस प्रमुख नारायण यांनी केली. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, जिल्ह्यातील मुर्डेश्वर हे ठिकाण प्रवाशांचे स्वर्ग बनून राहिले आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रमुख पर्यटन स्थळ बनून राहिलेल्या मुर्डेश्वरात प्रत्येक दिवशी हजारो पर्यटक दाखल होत असतात.
मुर्डेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस्तीमक्की येथील एका खासगी हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासह अन्य काही गैरधंदे चालतात. यांची माहिती मिळाल्यानंतर येथील सीईएनच्या डीवायएसपी अश्विनी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी रात्री छापा टाकण्यात आला होता. त्या कारवाईवेळी दोन तरुणांनी आपल्या बॅग आणि अन्य साहित्य हॉटेलमध्येच सोडून पलायन केले होते. छाप्यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसह चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.