अंदमान-निकोबारमध्ये पर्यटनाच्या पर्यावरणीय प्रभावाचे अध्ययन
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेयर
अंदमान आणि निकोबारमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तेथील प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याच्या अंतर्गत प्रशासन नवी बेटे खुली करणे आणि वाढत्या पर्यटनाच्या प्रभावाचे अध्ययन करत आहे. पर्यावरण सुरक्षित राहिल आणि पर्यटन संतुलित पद्धतीने वाढावे हा यामागील उद्देश आहे.
केंद्रशासित प्रदेश स्वत:चे नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि मँग्रोव कयाकिंग टूरसाठी ओळखला जातो. येथे आता देशांतर्गत पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी 4 लाख लोकसंख्या असलेल्या बेटावर 7.2 लाख पर्यटक दाखल झाले होते. तर चालू वर्षी सप्टेंबरपर्यंत 6 लाख पर्यटक पोहोचले आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा पर्यटकांसाठी महत्त्वाचा हंगाम असल्याचे पर्यटन सचिव ज्योति कुमारी यांनी सांगितले आहे.
नव्या बेटांना खुले करणार
बेटांची पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता मर्यादित आहे आणि केवळ विमानाद्वारे पोहोचण्याचा पर्याय असल्याने पर्यटकांची संख्या नियंत्रित राहते. यामुळे बेटांवरील प्रभाव कमी आहे. नव्या बेटांना हळूहळू पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. अलिकडेच नॉर्थ सिंक बेट, जॉली बॉय आणि रेड स्किन बेट खुले करण्यात आले असून तेथे 200 पर्यटकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशाप्रकारे सरकार पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन दोन्हींना प्रोत्साहन देत आहे. आतापर्यंत 21 बेटं खुली करण्यात आली असून तेथील प्रभावावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याचे ज्योति कुमारी यांनी सांगितले.
पर्यटनात विविधता अन् नवे अनुभव
पर्यटनात आता पक्षीनिरीक्षण आणि एस्ट्रो-टूरिजमवर (खगोल पर्यटन) लक्ष दिले जात आहे. अंदमानमध्ये 32 प्रकारचे स्थानिक पक्षी आढळून येतात, यामुळे अनेक लोक एकाच दिवशी पक्षीनिरीक्षणासाठी येत असल्याचे पर्यटनसचिवांनी सांगितले आहे. खगोल पर्यटनाच्या अंतर्गत पर्यटकांना दोन्ही गोलार्धांचे तारामंडळ पाहण्याची संधी मिळणार आहे. सरकारने गाइड्सना प्रशिक्षित अन् प्रमाणित करण्यासाठी नवे धोरण तयार केले आहे. याचबरोबर स्थानिक युवांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. पर्यटक नोंदणी करून आगामी खगोलीय कार्यक्रमांची माहिती प्राप्त करू शकतात. याचबरोबर अंदमानमध्ये मासेमारी अन् वॉटरस्पोर्ट्स देखील पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. नव्या बेटांना खुले करताना सरकार पर्यावरण आणि पर्यटनाचे संतुलन राखण्यावर विशेष लक्ष देत असल्याचे ज्योति कुमारी यांनी म्हटले आहे.