सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून मृत्यू
भटकळ तालुक्यात घडली घटना
कारवार : सहलीसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी भटकळ तालुक्यातील पंचायतीच्या कार्यालयासमोरील खुल्या जागेत घडली. दुर्गाप्पा हरिजन (वय 14) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आठवी इयत्तेत शिकत होता. सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे 100 विद्यार्थी आणि 13 शिक्षक जोगफॉल्स कोल्लूर, मोकांबिका आदी स्थळाना भेट देऊन जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटन आणि श्रीक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुर्डेश्वर येथे दाखल होणार होते. तत्पूर्वी औषधे खरेदी करण्यासाठी सहलीवर आलेले विद्यार्थी भटकळ तालुका पंचायतीच्या कार्यालयासमोर उतरले होते. त्यावळी कांही विद्यार्थी कार्यालयासमोरील खुल्याजागेत लघुशंकेसाठी गेले होते. त्यावेळी दुर्गाप्पा हा विद्यार्थी कठडा नसलेल्या विहिरीत पडला. तेव्हा अन्य विद्यार्थ्यांनी ओरडायला सुरुवात केली. विद्यार्थ्याला वाचविण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सर्वांनी मिळून बेशुद्धावस्थेत असलेल्या विद्यार्थ्याला विहिरीबाहेर काढले आणि त्याला उपचारासाठी भटकळ तालुका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.