विद्यार्थी करताहेत विमानातून शैक्षणिक सहल
सोनट्टी शाळेतील शिक्षकाच्या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा : नियमित हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांचा हैदराबाद प्रवास
बेळगाव : शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने एका शिक्षकाने स्वखर्चातून अनोखा उपक्रम राबविला असून, याची आज सर्वत्र चर्चा होत आहे. शाळेतील तासिकांना (पिरिएड) नियमितपणे हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना विमानातून शैक्षणिक सहल स्वखर्चातून घडवून आणण्याचा शिक्षकाचा हा उपक्रम पालक व शिक्षक वर्गात कौतुकास्पद ठरला आहे. बेळगाव तालुक्यातील सोनट्टी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या शिक्षकाने हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांचा तीन दिवसांचा हैदराबादचा प्रवास विमानाने 2.10 लाख रुपये खर्चातून होणार आहे. पर्यटनस्थळावरील प्रवेशशुल्क वगळता इतर सर्व खर्च हे शिक्षकच पाहणार आहेत. या शिक्षकाने स्वत:ला मिळणाऱ्या मासिक वेतनातून विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास घडविण्याचा विचार हा इतर शिक्षकांनाही आदर्शवत ठरला आहे. प्रकाश देयन्नवर असे शिक्षकाचे नाव आहे.
17 विद्यार्थ्यांची निवड
शिक्षक देयन्नवर यांनी राबविलेल्या या उपक्रमाला वर्षभरात नियमितपणे तासिकांना हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 17 जणांची निवड केली. या विद्यार्थ्यांबरोबर शाळेतील अन्य तीन शिक्षकही असतील. शाळा सुधारणा-व्यवस्थापन समितीच्या सदस्यासह एकूण 21 जणांची तुकडी गुरुवार दि. 7 रोजी सांबरा विमानतळावरून हैदराबादकडे रवाना झाली. हैदराबाद पर्यटनाचे एकूण तीन दिवस राहणार असून तिकीट, भोजन, निवास असा एका विद्यार्थ्यासाठी 10 हजार रुपये खर्च होणार आहे. त्याशिवाय तीन शिक्षक व एक शाळा सुधारणा व्यवस्थापन सदस्य अशा चार जणांचा खर्चही शिक्षक देयन्नवर करणार आहेत. हैदराबाद येथील रामोजीराव फिल्म सिटी, सालार्जंग वस्तूसंग्रहालय, गोलकोंडा फोर्ट, बिर्ला मंदिर, चारमिनार, राजवाडे, स्नो फॉल्स अशा ऐतिहासिक स्थळांची भेट विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात येणार आहे. विमानातून प्रवास करण्याची इच्छा अनेक विद्यार्थी व शिक्षकांना असते. पण खर्चिक बाब म्हणून शक्यतो याचा अधिक विचार कोण करत नाहीत. मात्र सोनट्टी शाळेतील एका शिक्षकाच्या उदारदायत्वामुळे विद्यार्थ्यांबरोबर काही शिक्षकांनाही विमानातून प्रवास करण्याची संधी लाभली आहे. विमानातून प्रवास करणाऱ्या तुकडीमध्ये रतन पाटील, विद्या बडिगेर, प्रकाश हुलमनी आदींचा समावेश आहे. विमान प्रवासावर गेलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना शाळा सुधारणा-व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम
सोनट्टी सरकारी कन्नड शाळेमध्ये स्वच्छता, शिस्तही कमालीची आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा सुनियोजितपणे अमलात आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक प्रकाश देयन्नवर परिश्रम घेत असतात. आता तर शाळेतील विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास घडवून आणण्याचा उपक्रम हाती घेतल्याने शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत हवाई प्रवासाची संधी लाभली आहे. देयन्नवर यांचा सेवाकाळ केवळ तीन वर्षे शिल्लक असून उर्वरित तीन वर्षांतही विद्यार्थी आणि शाळेच्या कल्याणाच्यादृष्टीने नवे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढील वर्षी दिल्लीचा प्रवास घडवून आणण्याचा विचार
शाळेला नियमितपणे हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमानातून मोफत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. सहलीसाठी 20 विद्यार्थ्यांपैकी 17 जणांची निवड केली. शिक्षक सेवेतील आपली आणखी तीन वर्षे शिल्लक असून पुढील तीन वर्षांच्या काळात अशाच प्रकारच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन आपण करू. पुढील वर्षी विद्यार्थ्यांना विमानातून दिल्लीचा प्रवास घडवून आणण्याचा विचार आहे.
- प्रकाश देयन्नवर, शिक्षक, सोनट्टी सरकारी उच्च प्राथमिक शाळा.