प्रवेशातील दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
दहावी-बारावीचा निकाल यंदा पंधरा दिवस अगोदर जाहीर झाला. परंतू अकरावी, तंत्रनिकेतन, आयटीआय, अभियांत्रिकी, मेडिकल, विधी विभागाच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ संपता-संपेनासा झाला आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठीचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे दोनवेळा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. अकरावी प्रवेश यंदा राज्यस्तरीय असल्याने कोणाचा कोणाला मेळ नसल्याचे चित्र आहे. एकूणच व्यवसायिकसह पारंपारिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक फटका बसला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा दहावी-बारावीचा निकाल वेळेत जाहीर करण्यात आला. विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कारही टाकला होता. बहिष्कार मागे घेतल्यानंतर शिक्षण मंडळाने दिलेल्या वेळेत पेपर तपासून दिले. परिणामी दहावी-बारावीचा निकाल जवळपास पंधरा दिवस अगोदर जाहीर झाला. त्यामुळे अकरावी, पदवी, तंत्रनिकेतन, आयटीआय, अभियांत्रिकी, मेडीकल आदी अभ्यासक्रमाचे प्रवेश वेळेत होतील, अशी अपेक्षा होती. परंतू अकरावीची प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदाच राज्यभर एकत्रितपणे राबवण्यात आल्याने सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका बसला.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. 30 जूनला अंतिम यादी जाहीर होणार होती, ती 28 जूनलाच अचानकपणे जाहीर करण्यात आली. शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदींचा या प्रवेश प्रक्रियेत सहभाग होता. या सर्व कार्यालयांना कोणाला कोणाचा मेळ नसल्याचे चित्र आहे.
आयटीआय आणि तंत्रनिकेतनच्या प्रवेशातही सर्व्हर डाऊनचा फटका विद्यार्थ्यांना बसला. या दोन्ही अभ्यासक्रमाचे अर्ज भरण्यास दोनवेळा मुदवाढ देऊन वेळापत्रकातही सातत्याने बदल केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तंत्रनिकेतच्या प्रवेश प्रक्रियेत सुरूवातीला सर्व्हर डाऊनचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतू त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू असूनही काही विद्यार्थ्यांना पूरक कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी अर्ज कन्फर्म करू शकले नाहीत. ही अडचण लक्षात घेवून एकदा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. परंतू मोजकेच अर्ज कन्फर्म झाल्याचे चित्र आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करणार, असा दिंडोरा पिटणाऱ्या राज्य शासनाची ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी व पालकांसाठी डोकेदुखी बनली आहे.
जेईई, सीईटी आणि नीट परीक्षेतच गोंधळ झाल्याने या परीक्षांचे निकाल उशिरा जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी अर्ज भरणे व कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परंतू या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अगदी थोडा कालावधी दिला असल्याने वेळेत अर्ज भरले जातील की नाही याची खात्री नाही, असे शिक्षण तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सर्वच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही ना काही गोंधळ झाल्याचे चित्र आहे.
- सर्व्हर डाऊनचा फटका
ग्रामीण भागात ऑनलाईन अर्ज भरता येत नाही म्हणून विद्यार्थी व पालक 40 किलोमिटर कोल्हापूर शहरात येवून अर्ज भरीत होते. शहरातही सर्व्हर डाऊन असल्याने एक अर्ज भरण्यासाठी किमान आर्धा दिवस नेट कॅफेमध्ये थांबावे लागत होते. अकरावीचा अर्ज भरताना अनेकदा तर अर्ज न भरताच घरी परतावे लागत होते. परिणामी विद्यार्थी व पालकांना आर्थिक फटका सोसावा लागला.
- अकरावी प्रवेश
भरलेले अर्ज पैसे भरलेले पहिला भाग दुसरा भाग मिळालेले प्रवेश
41899 41385 41146 39274 1681
- आयटीआय प्रवेश
उपलब्ध जागा भरलेले अर्ज कन्फर्म केलेले अर्ज
1388 1751 1751
- तंत्रनिकेतन प्रवेश
उपलब्ध जागा भरलेले अर्ज कन्फर्म अर्ज
7100 8878 8806