राष्ट्र उन्नतीसाठी विद्यार्थ्यांनी तत्पर रहावे : प्रा. त्यागराज
आरसीयू पीजी जिमखाना पुरस्कारांचे वितरण : विविध मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : शिक्षण, ज्ञान व कौशल्याबरोबरच विवेक, विनय, संस्कार आणि संस्कृती जीवनात यशासाठी आवश्यक आहेत, असे राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी सांगितले. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आरसीयू पीजी जिमखाना पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अनेक जण ज्ञान आणि शिक्षण मिळवलेले असतात. मात्र, त्यांच्यामध्ये विनय आणि संस्कारांचा अभाव असतो. त्यामुळेच ते अपयशी ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय व उत्तम संस्कारांची गरज असते. निरंतर परिश्रम व अभ्यासामुळे यश मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा आदर राखावा. त्यांची सेवा करावी. जन्मदाते व शिक्षण देणारे गुरु यांचा मान उंचावेल, असे सत्कार्य करावे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वॉट्सअप व इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांचा अतिवापर विद्यार्थ्यांनी टाळावा. केवळ चांगल्यासाठीच समाजमाध्यमाचा वापर करावा. 2040 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाज व राष्ट्र उन्नतीसाठी विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आरसीयूचे कुलसचिव संतोष कामगौडा, नाट्याकर्मी श्रीपती मंजनबैल, हास्यकलाकार वाय. व्ही. गुंडूराव, एन. रामनाथ आदींचीही भाषणे झाली. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले. आरसीयूच्या राज्यशास्त्र विभागाला चॅम्पियनशीप तर कन्नड विभागाला रनरअप पुरस्कार मिळाला. पीजी जिमखान्याच्या संचालक प्रा. मनीषा नेसरकर यांनी स्वागत केले. सोनाली कार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. भरतेश गुरव यांनी आभार मानले. यावेळी मूल्यमापन विभागाचे कुलसचिव प्रा. रविंद्रनाथ कदम, डॉ. चंद्रशेखर एस. व्ही., डॉ. मंजुनाथ, डॉ. जगदीश आदींसह विद्यार्थी, जिमखाना प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.