Pandharpur : विठ्ठल महापूजेत विद्यार्थ्यांनाही संधी द्यावी ; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मागणी
भुसे यांच्या सूचनेला वारकरी संप्रदायाचा विरोध
पंढरपूर : आषाढी व कार्तिकी यात्रेत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. या महापूजेचा जिल्हा परिषदेमधील एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यामुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. या मागणीला वारकरी संप्रदाय व भाविकभक्तातून विरोध होत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत सूचना केल्या आहेत. भुसे म्हणाले, आषाढी यात्रेत विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री तर कार्तिकी यात्रेत विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते.
आता या महापुजेच्या वेळेस जिल्हा परिषदेमधील एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना महापूजेसाठी संधी देण्यात यावी, असा विचार त्यांनी मांडला. तथापि महाराज मंडळीनी यास विरोध केला असून नवीन प्रथा सुरू करू नका, असे सांगितले.
वास्तविक पाहता विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता होते. एवढ्या लवकर विद्यार्थ्यांना महापूजेसाठी बोलाविणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले. मात्र भुसे म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे साहित्य आहे. तसेच वारकरी संप्रदायाचे महत्त्व आहे. यामुळे विद्यार्थ्यांना संतांचे व वारकरी संप्रदायांचे महत्व जाणून घेण्यासाठी त्यांना महापूजेसाठी निमंत्रण देणे गरजेचे आहे, अशी भूमिका घेतली.
आता शासन मंदिर समिती व प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. या नवीन प्रथा सुरू केल्यानंतर प्रशासनाची डीच होकेदुखी वाढणार आहे. अशा कुठल्याही प्रकारच्या नव्या प्रथा सुरू करू नयेत, अशी मागणी वारकरी भाविक भक्तांतून होत आहे.