गर्लगुंजी येथे विद्यार्थ्यांचा रास्तारोको
सकाळच्या सत्रात वेळेवर बस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : आश्वासनानंतर आंदोलन मागे
खानापूर : गर्लगुंजी येथून सकाळच्या सत्रात वेळेवर बस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याबाबत खानापूर आगार प्रमुखांना वेळोवेळी निवेदन देऊन बस वेळेवर सोडण्यात याव्यात, यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र याची दखल न घेतल्याने गुरुवारी सकाळी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गर्लगुंजी येथे विद्यार्थ्यांसमवेत रास्तारोको करण्यात आला. याबाबतची माहिती आगारप्रमुखांना मिळताच खानापूर बस आगाराचे उपव्यवस्थापक विठ्ठल कांबळे आणि त्यांच्या सहकार्यानी गर्लगुंजी येथे आंदोलनस्थळी भेट देवून निवेदनाचा स्वीकार केला. आणि सकाळच्या सत्रात बस वेळेवर सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. गर्लगुंजी येथून सकाळच्या सत्रात खानापूरहून बस वेळेवर येत नसल्याने हायस्कूल तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रातील तासाला मुकावे लागते. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी सकाळी खानापूरहून गर्लगुंजीला 8 वाजता बस येणे गरजेचे आहे. मात्र गेले काही दिवस ही बस 10.30 वाजता गर्लगुंजीत येत असल्याने ती खानापूरला 11 नंतर पोहचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पहिले दोन तास वाया जात आहेत.
तसेच या सर्व बसेस वरील बसस्टँडवरुन फिरुन खानापूरला जात असल्याने गर्लगुंजी येथील खालच्या बसस्टॉपवर येत नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना 1 कि. मी. चालत जावे लागत आहे. यासाठी सर्व बसेस खालच्या बसस्टॉपवर सोडण्यात याव्यात, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता रास्तारोको केला. याची माहिती खानापूर आगार प्रमुखांना मिळताच त्यांनी गर्लगुंजी येथील आंदोलनस्थळी खानापूर उपआगाराचे उपव्यवस्थापक विठ्ठल कांबळे यांनी आपल्या सहकार्यासह आंदोनलकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आणि या पुढे वेळेवर बस सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आंदोलनस्थळीच बालदिन साजरा
सकाळी विद्यार्थ्यांनी रास्तारोकोचे आंदोलन हाती घेतले. त्यामुळे पहिल्या तासात शाळेवर पोहचता येणार नाही, याची दखल घेऊन उपस्थित ग्रामस्थ आणि पालकानी आंदोलनस्थळीच बालदिन साजरा केला. नेहरुंच्या फोटोचे पूजन करून केक कापून बालदिन साजरा करण्यात आला.