धामणे येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन
अपुऱ्या बससेवेमुळे बेळगाव शहराकडे जाणाऱ्या शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास : परिवहन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
वार्ताहर /धामणे
धामणे गावच्या अपुऱ्या बससेवेमुळे बेळगाव शहराकडे शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास होत असल्याने शुक्रवार दि. 7 रोजी सात व आठ वाजता येणाऱ्या बसच्या दोन गाड्या अडवून विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन छेडले. धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील शेकडो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. परंतु सकाळी शाळेच्या वेळेत आणि सायंकाळी शाळा सुट्टी झाल्यानंतर बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. गावाला दोन बसेस असून शाळेच्या वेळेत बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्या बसेस वेळेत सोडा, असे निवेदन ग्राम पंचायत अध्यक्ष पंडित पाटील व ग्राम पंचायत सदस्यांनी बसच्या अधिकाऱ्यांना भेटून दिल्या.
निवेदनात असे म्हटले आहे की, सकाळी देवगणहट्टीहून येणारी बस भरून येत आहे. त्यामुळे धामणे गावातील विद्यार्थ्यांना बसण्यास जागा मिळत नाही. त्यासाठी सकाळी व सायंकाळी धामणे गावासाठी जादा बस सोडावी. त्याचप्रमाणे दररोज येणाऱ्या दोन्ही बसेस शाळेच्या वेळेप्रमाणे आल्या पाहिजेत, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन स्विकारून बसचे अधिकारी एम. जी. बेल्लूर यांनी यापुढे बस वेळेत येईल व जादा बस चार दिवसात सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन थांबले. धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येने आंदोलनात भाग घेतला होता. त्याचप्रमाणे धामणे ग्रा. पं. अध्यक्ष पंडीत पाटील, सदस्य एम. आर. पाटील, यल्लापा मरगाणाचे, एम. के. पाटील, राजू बडगेर, बाळू जायाण्णाचे, शिवाजी पाटील आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.