For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धामणे येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन

12:23 PM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
धामणे येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन
Advertisement

अपुऱ्या बससेवेमुळे बेळगाव शहराकडे जाणाऱ्या शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास : परिवहन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Advertisement

वार्ताहर /धामणे

धामणे गावच्या अपुऱ्या बससेवेमुळे बेळगाव शहराकडे शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास होत असल्याने शुक्रवार दि. 7 रोजी सात व आठ वाजता येणाऱ्या बसच्या दोन गाड्या अडवून विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन छेडले. धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील शेकडो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. परंतु सकाळी शाळेच्या वेळेत आणि सायंकाळी शाळा सुट्टी झाल्यानंतर बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. गावाला दोन बसेस असून शाळेच्या वेळेत बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्या बसेस वेळेत सोडा, असे निवेदन ग्राम पंचायत अध्यक्ष पंडित पाटील व ग्राम पंचायत सदस्यांनी बसच्या अधिकाऱ्यांना भेटून दिल्या.

Advertisement

गेल्या 10-12 दिवसांपूर्वी निवेदन देवूनदेखील बसच्या अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने गावातील सर्व विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बस रोको आंदोलन छेडले. सकाळी 7 वा. पासून विद्यार्थी धामणे येथील बसस्थानकावर एकवटून सकाळी आलेल्या दोन्ही बस रोखून धरल्याने सकाळी 10 वा. बसचे अधिकारी एम. जी. बेल्लूर हे आंदोलनस्थळी आले. त्याचबरोबर वडगाव ग्रामीणचे सीपीआय नाडगौडा हे पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले. धामणे गावाच्या बसमध्ये सेवा बजावत असलेले कंडक्टर शिवानंद होरकट्टी हे मनमानी करत आहेत. ते ड्रायव्हरचेसुद्धा ऐकत नाहीत. आपल्या मर्जीच्या वेळेत बस सोडतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या समोर मांडली. त्यानंतर विद्यार्थी व ग्रा. पं.च्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, सकाळी देवगणहट्टीहून येणारी बस भरून येत आहे. त्यामुळे धामणे गावातील विद्यार्थ्यांना बसण्यास जागा मिळत नाही. त्यासाठी सकाळी व सायंकाळी धामणे गावासाठी जादा बस सोडावी. त्याचप्रमाणे दररोज येणाऱ्या दोन्ही बसेस शाळेच्या वेळेप्रमाणे आल्या पाहिजेत, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन स्विकारून बसचे अधिकारी एम. जी. बेल्लूर यांनी यापुढे बस वेळेत येईल व जादा बस चार दिवसात सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन थांबले. धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येने आंदोलनात भाग घेतला होता. त्याचप्रमाणे धामणे ग्रा. पं. अध्यक्ष पंडीत पाटील, सदस्य एम. आर. पाटील, यल्लापा मरगाणाचे, एम. के. पाटील, राजू बडगेर, बाळू जायाण्णाचे, शिवाजी पाटील आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.