मोबाईल अॅप्समुळे विद्यार्थी भरकटले
काडसिद्धेश्वर स्वामी : प्रबुद्ध भारततर्फे कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
देशाच्या सीमा व किनारपट्टीच नाही तर संपूर्ण देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. आजकाल शिक्षण संस्थाही समाजवादात ओढल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न होत आहे. देशात घडणाऱ्या आंदोलनांना विदेशातून पैसा व ताकद पुरविली जात आहे. विविध मोबाईल अॅप्समुळे विद्यार्थीही भरकटत आहेत. आपण योग्यरितीने वागलो तर केवळ 15 दिवसात समाज सुधारू शकतो, असे रोखठोक विचार कोल्हापूर येथील कणेरी मठाचे मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मांडले.
प्रबुद्ध भारत संस्थेच्यावतीने शुक्रवारी ‘देशातील आंतरिक अशांती-राष्ट्रीय एकात्मता’ यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते. व्यासपीठावर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एस. पाच्छापुरे, माजी पोलीस महानिरीक्षक गोपाल होसूर उपस्थित होते.
ए. एस. पाच्छापुरे यांनी सध्याच्या सुरक्षा यंत्रणांवर भर दिला. सैनिक ज्या प्रकारे देशाची सेवा करतात, त्याच पद्धतीने पोलिसांनीही सेवा बजावणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा राजकीय दबावापोटी पोलिसांना वेगळी भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गोपाल होसूर म्हणाले, भ्रष्टाचार हा देशाला कर्करोगाप्रमाणे कुरतडत चालला आहे. त्यामुळे या कर्करोगाची वेळीच केमोथेरपी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा नाईक यांनी केले. वैभव कुलकर्णी याने स्वागतगीत सादर केले. मेजर जनरल के. एन. मिर्जी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सदानंद हुंबरवाडी, राम भंडारे, अय्यप्पा रामराव, डॉ. शैलजा हिरेमठ, बी. आर. शंकरगौडा, कर्नल रामकृष्ण जाधव, अरुणा सरफ, जे. पी. नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.