कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विद्यार्थ्यांचे ‘भावविश्व’ आनंददायी शिक्षणातून जपण्याची गरज

06:24 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाळेत दहा मिनिटे उशिरा आल्यामुळे विद्यार्थिनीला शिक्षिकेने शिक्षा म्हणून शंभर उठाबशा काढायला लावल्या. त्यामुळे मुलीला श्वास घेण्यास आणि कंबरेला त्रास झाल्याने मृत्यू झाला. ही अत्यंत संतापजनक घटना मुंबईतील एका शाळेत अलीकडेच घडल्याचे समोर आले. यानिमित्ताने शाळा विद्यार्थ्यांना कशी कठोर वागणूक देतात याचे अनेकांनी आपले अनुभव सोशल मीडियावर शेयर केले. ते पाहून शिक्षकांबद्दल अधिकतर प्रतिकूल शेरे आणि अनुभव वाचायला मिळाले. एकूणच संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो आणि शिक्षणाचे यांत्रिकीकरण झाल्याचे दिसून येते. आज शाळेत जाणारी मुले पाहिली की ठळकपणे एक गोष्ट जाणवते ती म्हणजे अत्यंत तणावाखाली वावरणारी मुले. मुलांच्या पाठीवरचे ओझे तर खूपच वाढले आहे पण त्याचबरोबर मुलांच्या मनावरचे ओझेही या असंवेदनशील व्यवस्थेने वाढवले आहे. मुलांच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्याचे प्रयत्न अत्यंत तोकडे दिसून येतात. दिवसभर पुस्तकी ज्ञानाचा भडीमार करायचा आणि मुलांची दमछाक करून टाकायची आणि वर हे कमी होते म्हणून की काय ‘होमवर्क’ एवढं द्यायचं की मुले घरी गेल्यानंतरही शाळेच्या दहशतीच्या वातावरणातच असतात. शाळा हे खरे तर मुलांसाठी आकर्षण केंद्र व्हायला हवे. विद्यार्थ्यांना आपण शाळेत असताना अधिक सृजन आनंद अनुभवतो आहोत याचा विश्वास मनोमन वाटला  पाहिजे. मुलांनी अत्यंत मोकळ्या मनाने, आत्मविश्वासाने आणि आनंदाने वावरावे यासाठी शाळांनी आपल्या शिक्षकांना प्रशिक्षित करायला हवे. आज प्रत्येक छोट्या गावांत ‘इंटरनॅशनल’ शाळा झाल्या आहेत. शिक्षण सोडून इतर बाबीवरच जास्त भर दिसून येतो. मुलांचे भावविश्व जपण्याचे आव्हान आज शाळेसमोर आहे. आणि यासाठी या सर्व शाळांचीच ‘शाळा’ घेतली जाणे अत्यंत गरजेचे आहे. तरच अशा घटना टाळता येऊ शकतील.

Advertisement

आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी एक महत्त्वाची सुधारणा करायला हवी, ती म्हणजे, शिक्षण आनंददायी असावे. आज शाळांमधे शिक्षण, अभ्यास ह्या गोष्टी मुलांना कंटाळवाण्या किंवा अनेकदा ताणतणाव देणाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे शाळा त्यांना आवडत नाही. त्यामुळे ज्ञान मिळवण्याचा उद्देश बाजूला राहतो आणि त्यातून नुसते कोरे आणि माहिती मेंदूत कोंबलेले विद्यार्थी बाहेर पडतात. त्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा करायला हवी. अभ्यासक्रम अधिक सुलभ आणि रोचक करायला हवा. शिक्षकांनीही अभिनव कल्पना शोधून काढत, शिक्षण अधिक आनंददायी कसे होईल, याचा प्रयत्न करायला हवा.

Advertisement

सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक हिंसात्मक घटना, आत्महत्येचे प्रसंग अवतीभवती घडताना दिसतात. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक सकारात्मक आणि आनंददायी वातावरण मिळाले पाहिजे. वर्गात शिक्षकाने प्रेमळ आणि सहनशील वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्यासाठी, चुकीचे प्रश्न विचारण्यासाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. अशा वातावरणात विद्यार्थी न घाबरता शिकू शकतात. आनंददायी शिक्षण हे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणारे नसावे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असावे. अशा शिक्षणात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा, जेणेकरून ते शिकण्याची प्रक्रिया उपभोगू शकतील आणि त्यातून आनंद प्राप्त करू शकतील. शिक्षण हे विद्यार्थी-केंद्रित असावे. शिक्षकाने विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणावा. प्रश्न विचारणे, आपले विचार मांडणे, समूह कार्यात सहभागी होणे यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. ते फक्त ज्ञान घेणारे नसतात, तर ते स्वत: ज्ञान निर्माण करण्यास सक्षम होतात.

शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असावा. त्याने विद्यार्थ्यांवर केवळ आदेश देणारा न राहता, त्यांना प्रोत्साहन देणारा, त्यांच्या समस्या समजून घेणारा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा असावा. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, क्षमतांचा विचार करून शिक्षण पद्धती निवडली पाहिजे. आनंददायी शिक्षण हे केवळ शैक्षणिक विषयांपुरते मर्यादित नसावे, तर त्यात जीवनातील मूल्यांचा समावेश असावा. प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि कर्तव्य भावना यांसारख्या मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. असे शिक्षण विद्यार्थ्यांना समाजाच्या जबाबदार नागरिकांमध्ये रूपांतरित करते. आनंददायी शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ शैक्षणिक ज्ञान पुरवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्ये आणि सर्जनशीलता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यातून विद्यार्थी आत्मनिर्भर बनतात आणि समाजात आपली एक ओळख निर्माण करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत आणि गती वेगळी असते. म्हणूनच, आनंददायी शिक्षणात प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार शिक्षणाचे नियोजन केले पाहिजे. काही विद्यार्थ्यांना कला, संगीत, नृत्य यात आवड असू शकते, तर काहींना विज्ञान, गणित किंवा खेळ यात अधिक रुची असू शकते. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिकण्याची संधी दिली तर ते शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायक आणि अर्थपूर्ण ठरते.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्यास ते अधिक आत्मसात करतात. प्रयोगशील शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देते आणि त्यांना स्वत:च्या अनुभवातून शिकण्यास प्रवृत्त करते. तसेच, समस्या-आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना विचार करण्याची, समस्या सोडवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करते. अशा पद्धतीने शिकवल्याने विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता व्यावहारिक ज्ञान प्राप्त करतात. सुशिक्षित पिढी, सक्षम, सुसंस्कृत झाली आहे का? हा विचार आपण करायला हवा आणि जर तसं नसेल, तर आपली शिक्षणपद्धती कुठे चुकते आहे, त्यात काय त्रुटी राहिल्या आहेत, याचा आढावा घ्यायला हवा, त्यावर विचारमंथन करायला हवं.

आपल्या शिक्षण क्षेत्राकडे बघितलं तर, शहरी भागातल्या चांगल्या मात्र महागड्या खासगी, विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ज्यात, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या मुलांना शिक्षण घेता येतं. तर, दुसरीकडे गावात किंवा निमशहरी भागात असलेल्या साध्या शाळा, त्यातही विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक टंचाईमुळे चांगले शिक्षक किंवा चांगल्या सुविधा मिळत नाहीत. अशा दोन स्तरातल्या शाळा असल्यानं, मुलांच्या शिक्षणाच्या दर्जात कमालीची तफावत आढळते. आर्थिक स्तर किंवा शहरी-ग्रामीण भाग यावर मुलांचा शिक्षणाचा दर्जा ठरू नये, मात्र दुर्दैवाने असं होत आहे. ही त्रुटी दूर करत गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

आज तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे, ह्या तंत्रज्ञानाचा शिक्षण व्यवस्थेत उपयोगही होतो आहे. मात्र, गुगलसारख्या साधनांनी माहितीची सहज उपलब्धता असल्याने, विद्यार्थ्यांना ज्ञानासाठी कष्ट घेण्याची, पुस्तकं, शब्दकोश, संदर्भ ग्रंथ बघण्याची, अभ्यास करण्याची इच्छा उरली नाही. एकप्रकारचा आळस निर्माण झाला आहे. शिक्षण, शिक्षक याविषयीचे गांभीर्य कमी झाले आहे. ज्ञानाची लालसा कमी होऊन, केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे एवढाच शिक्षणाचा उपयोग राहिला आहे आणि शिक्षणाचे व्यावसायिकरण, पर्यायाने अधोगती होण्यासही हीच बाब कारणीभूत आहे.

अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण शाळेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक स्तरावरूनही शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदल घडत आहेत. शाळेमध्ये वातावरण हे प्रसन्न असावे. विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शनिवारी तसेच रविवारीदेखील शाळेत यावेसे वाटले पाहिजे. मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव येत राहणे गरजेचे आहे. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवणे गरजेचे आहे. आनंददायी शिक्षणासाठी शिक्षकांची भूमिका, शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही. शिक्षणाचा पसारा संख्यात्मक खूपच वाढला आहे. अगदी ईयत्ता पाचवीपासून जेईई अॅडवान्सड प्रवेश परीक्षा वा आयएएससाठी तयारी करून घेणाऱ्या शाळांचा उदय झाला आहे. पण या शिक्षणाच्या बाजारात चांगला माणूस घडवणाऱ्या शाळा आता अगदीच कमी संख्येने दिसून येतात.

-प्रा. डॉ. गिरीश नाईक

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article