रिक्षामामांसोबत विद्यार्थ्यांची धमाल
शैक्षणिक वर्ष समाप्तीनिमित्त उद्यानात करण्यात आली मौजमस्ती
बेळगाव : परीक्षा संपल्या तरी विद्यार्थ्यांबरोबरचे ऋणानुबंध कायम असतात. याच ऋणानुबंधातून रिक्षामामांनी विद्यार्थ्यांसाठी उद्यानाची सफर व अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. आयुष्यातील एक उनाड दिवस समजून विद्यार्थ्यांनीही आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आनंद साजरा केला. एकमेकाला रंग लावून आता दोन महिन्यांनंतरच भेटू, असे संदेशही दिले. बुधवारी टिळकवाडी येथील सायन्स पार्क येथे विविध रिक्षाचालकांनी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळावा भरविला होता. केएलएस स्कूल व हेरवाडकर स्कूलचे 300 हून अधिक विद्यार्थी एकत्र आले होते. या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत धमाल केली. चालू शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी सचिन पाटील, प्रसाद भातकांडे, सुशांत कांबळे, आकाश रायण्णाचे, कुलदीप चिमणे, सुभाष आपटेकर, दयानंद रंगरेज, जय आचार्य, विनोद यलजी, वैभव मोहिते, श्रीधर धामणेकर, विनोद देऊर यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
रिक्षाचालकांमधून मागणी
पुढील दोन महिने वर्दी रिक्षा बंद असणार असल्याने त्यांना प्रवासी भाड्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. परंतु, शक्ती योजनेमुळे रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले आहे. मोफत बसप्रवासामुळे महिला प्रवासी बसला प्राधान्य देत असल्याने रिक्षाला प्रवासी मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांसाठी एखादी योजना जाहीर करण्याची मागणी रिक्षाचालकांमधून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते...
वर्दीच्या रिक्षामुळे दहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांबरोबर जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. रोज सकाळी विद्यार्थ्यांना आणायला जायचे, संध्याकाळी घरी सोडायचे. हा दिनक्रम पुढील दोन महिने असणार नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षातील शेवटचा दिवस आनंदात जावा, यासाठी त्यांना उद्यानात नेऊन अल्पोपाहार देण्यात आला.
- सचिन पाटील (रिक्षाचालक)