Satara News : बेलवडे बुद्रुक येथे दत्त जयंती उत्सवात विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
ब्राह्मदास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मंदिर परिसर स्वच्छतेत सहभाग
वाठार : बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात संपन्न झाला. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात मुलांना आकर्षित करण्यासाठी आलेले विविध प्रकारचे खेळण्याची दुकाने, खाद्यपदार्थ, मिठाईचे गाडे यांच्यामुळे मंदिरासह परिसरात पडलेला घनकचरा येथील ब्रह्मदास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व युवकांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ केला.
बेलवडे बुद्रुक येथील दत्त मंदिरामध्ये दरवर्षी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर या दिवशी मंदिर परिसरात उत्सवामध्ये विक्रीसाठीआलेल्या मिठाई, आईस्क्रीमचे गाडे, विविध प्रकारची खेळण्याची दुकाने, विविध प्रकारचे स्टॉल्स याच्यामुळे प्लास्टिक, कागदे वगैरेचा घनकचरा मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात साचला होता. हा कचरा प्राण्यांसह मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो, या विचाराने शिक्षकांसह युवकांनी हा परिसर स्वच्छ करण्याची ठरवले.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि युवकांनी दत्त मंदिर परिसर स्वच्छ करून घेतला. हातातील झाडूने दत्त मंदिर परिसर आणि अन्नदान परिसरात पडलेल्या कचऱ्याचे संकलन करून सर्व कचरा एकाच जागी करून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत शिक्षक पी. टी. पाटील यांच्यासह अशोक पवार, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.