बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांचा रास्तारोको
उचगावमध्ये बसेस अडवून तीन तास आंदोलन : आगारप्रमुखांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
वार्ताहर/उचगाव
उचगावला धावणाऱ्या बेळगाव बस डेपोच्या बसेसचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडल्याने बुधवारी सकाळी उचगावमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी रास्ता रोको करून तीन तास आंदोलन छेडले. अखेर ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे आणि बस डेपोचे मॅनेजर यांच्यामध्ये दूरध्वनीद्वारे संवाद साधून बसेस वेळेवर सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. उचगावला धावणाऱ्या बेळगाव डेपोच्या बसेसचे वेळापत्रक सातत्याने विस्कळीत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत एकही बस न आल्याने सकाळी बेळगाव शहरातील अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बरीच कुचंबणा झाली. त्यांना वेळेवर पोहोचता आले नाही. म्हणून संतप्त विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक उचगाव येथे अतिवाड, बेकिनकेरे, उचगाव या सर्व बसेस अडवून आंदोलन छेडले.
तीन तीन तास बसच नाहीत
सकाळी 8 ते 11 आणि दुपारी चार ते सहा या वेळेत अर्ध्या तासाला एक याप्रमाणे बसेस उचगावला येणे गरजेचे आहे. मात्र तीन तीन तास एकही बस येत नसल्याने प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची तोबा गर्दी बसस्थानकावर दिसून येते. यासाठी बेळगाव डेपो मॅनेजरनी तातडीने उचगावला अर्ध्या तासाला एक याप्रमाणे नियमित बससेवा सुरळीत ठेवावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.
बुधवारी सकाळी 11 वाजता उचगाव ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे यांनी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या आणि तातडीने त्यांनी डेपो मॅनेजरना फोन करून याबद्दल जाब विचारला. मात्र डेपो मॅनेजर उचगावला आलेच नाहीत. त्यांनी दूरध्वनीद्वारेच विद्यार्थ्यांना संप मागे घेण्याची विनंती करून बससेवा सुरळीत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कितीतरी निवेदने देऊनही डेपो मॅनेजर यांचे दुर्लक्ष
उचगावची बससेवा सुरळीत व्हावी, यासाठी उचगाव ग्रामपंचायतच्या वतीने अनेकवेळा बस डेपोच्या मॅनेजरना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र निवेदन दिल्यानंतर महिना दोन महिने बससेवा सुरू ठेवली जाते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या...याप्रमाणे बससेवा विस्कळीत होते. मात्र असे पुन्हा झाल्यास उचगावची जनता शांत बसणार नाही. याला बस डेपो मॅनेजरना उत्तर द्यावे लागेल, असा इशारा यावेळी मथुरा तेरसे यांनी दिला आहे.
बससेवा सुरळीत ठेवावी, अन्यथा बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर आंदोलन
उचगावमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी बेळगाव शहरातील शाळा, कॉलेजला जातात. मात्र बेळगाव डेपोच्या बसेस वेळेत येत नसल्याने आणि सातत्याने अनेक बसेस रद्द करणे यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तास चूकत आहेत. यासाठी तातडीने बेळगाव बस डेपोने सुरळीत बससेवा ठेवावी. अन्यथा बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावर आंदोलन छेडण्यात येईल.
- पालक अशोक गोंधळी
बसेस वेळेत जात नसल्याने शिक्षक वर्गात घेत नाहीत
शाळेला जाण्यासाठी घरातून आम्ही गडबड करून व्यवस्थित न खातादेखील कसातरी डबा घाईगडबडीमध्ये भरून घेऊन बसच्या प्रतीक्षेत बसस्थानकावर येऊन बसते. मात्र वेळेत बसच येत नसल्याने आम्ही शाळेत वेळेत पोहोचत नाही. यामुळे शाळेत गेल्यानंतर शिक्षक वर्गात घेण्यास मनाई करतात. यामुळे आमच्या अभ्यासाचे तास चुकत आहेत. अभ्यासाचे नुकसान होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी आमच्या उचगावची बससेवा सुरळीत करावी.
- विद्यार्थिनी कुरबूर.

