विद्यार्थी वर्गात, शिक्षक मात्र बीएलओच्या कामात
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बीएलओसाठी नियुक्ती
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
राज्य किंवा केंद्र सरकारचे कोणतेही काम असो की शिक्षकांची नियुक्ती केली जाते. परिणामी गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षक ‘आम्हाला शिकवू द्या’ म्हणून अशैक्षणिक कामे लावू नये अशी वारंवार मागणी केली जात आहे. परंतू शिक्षकांशिवाय कोणतेच शासकीय काम पूर्ण व अचूक होत नसल्याने राज्य शासन कोणतीही निवडणूक असो शिक्षकांची नियुक्ती करतातच. सध्या विधानसभा निवडणूकीसाठी सेवानिवृत्तीला एक महिना उरलेले व दिव्यांग सोडून जवळपास सर्वच शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थी अन् शिक्षक मात्र बीएलओच्या कामात, अशी स्थिती सध्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आहे.
शाळांमध्ये अलीकडे उपक्रमांची संख्या खूपच वाढली आहे. उपक्रम राबवल्यानंतर राज्य शासनाला ऑनलाईन रिपोर्टही सादर करावा लागतो. यामध्ये शिक्षकांचा भरपूरवेळ या अशैक्षणिक कामातच जातो. शिवाय शासनाचा कोणताही उपक्रम असला की प्रशिक्षण आलेच. प्रशिक्षक आणि प्रत्यक्ष कामात किमान पंधरा दिवस जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करता येत नसल्याने अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही. शासनाच्या योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना सातत्याने वर्गाच्या बाहेरच राहावे लागते. त्यात शिक्षकभरती नसल्याने सर्वच शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच बसतो. त्यामुळेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वगळता इतर शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची बीएलओच्या कामासाठी नियुक्ती करा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून वारंवार केली जाते. परंतू राज्य शासन शिक्षकांची मागणी विचाराधीन असल्याचे सांगत टोलवाटोलवी करीत असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास झाला तरच भविष्यात देश महासत्ता बनेल, अशी घोषणा सरकारकडून वारंवार केली जाते. परंतू याच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पुरेशा शिक्षकांची भरती केली जात नाही. परिणामी एकाच शिक्षकाला अनेक विषयाचे अध्यापन करावे लागते. नियमित अभ्यासक्रमासह व्यक्तिमत्व विकासासाठी शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा व कला प्रकारातही विद्यार्थ्यांना प्रविण करावे लागते. विद्यार्थ्यांचे कला, क्रीडा आणि शैक्षणिक विकास करणे शिक्षकांचे कर्तव्य आहे. परंतू शासनाच्या कामात शिक्षक एवढे व्यस्त आहेत की त्यांना विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नयेत, अशी मागणी पुढे येत आहे.
शासनाने इतर यंत्रणेकडे बीएलओची काम द्यावी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून इतर यंत्रणेकडे काम द्यावे, अशी मागणी केली आहे. तरी राज्य शासनाने या मागणीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
प्रसाद पाटील (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना)