‘हिंदू-मुस्लिम’ विषय बाजूला ठेवून भाजपने लढावे
कोल्हापूर :
काँग्रेस हा दिलेली आश्वासने पाळणारा पक्ष आहे. कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात आम्ही निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली त्याची सत्ता आल्यानंतर पुर्तता केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिला सुरक्षा या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते. पण हे विषय बाजूला ठेवून केवळ जाती पातीचे राजकारण करणाऱ्या भाजपने हिम्मत असेल तर ‘हिंदू-मुस्लिम’ हा विषय बाजूला ठेवून निवडणूक लढवावी असे थेट आव्हानकाँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी केले.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया श्रीनेत यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील उपस्थित होते.
सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशात पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर असायची. आज मात्र महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राची घसरण झाली असून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. राज्यातील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवलेत. महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांवर दरोडा टाकून ते गुजरातमध्ये नेले. त्यामुळे 9 ते 10 लाख युवकांचा रोजगारही गुजरातला गेला. देशातील आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सर्व देशवासीयांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. याबाबत महायुतीच्या नेत्यांकडून काहीच बोलले जात नाही. पंतप्रधान मोदी मात्र माफी मागण्याचे ढोंग करतात. आज देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून ही खेदजनक बाब आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि ताराराणीच्या या भूमीत माता-भगिनींवर अत्याचार होत असताना यातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम भाजप करत आहे. असा आरोप श्रीनेत यांनी यावेळी केला. राज्यात रोज सात कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे हे सरकार शेतकरी, महिला, युवकांसाठी नाही तर हे कोणासाठी चालवले जात आहे ? असा सवालही श्रीनेत यांनी उपस्थित केला.
देशातील आणि राज्यातील नेत्यांच्या पक्षांतराबद्दल बोलताना श्रीनेत म्हणाल्या,जे भित्रे होते ते घाबरून काँग्रेस सोडून गेलेत. मात्र जे वाघ आहेत, ते आज आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट करून आमदार सतेज पाटील यांचे कौतूक केले. काँग्रेस लोकांना वचन देते आणि ते पाळते. मात्र भाजप खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे लोक यापुढे भाजपच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नसून महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि निश्चितपणे जाहीरनाम्या प्रमाणे सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असा विश्वास देखील श्रीनेत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्यात 180 हून अधिक जागांवर महाविकास आघाडीला निश्चित यश मिळेल. कोल्हापुरकराना सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची संधी मिळाली असून ते या संधीचे सोने करतील.
धनंजय महाडिकांच्या धमकीला संपूर्ण महाराष्ट्र उत्तर देईल
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी ज्या महिला काँग्रेंसच्या रॅलीत जातील, त्यांचे व्हिडीओ बनवा, त्यांची व्यवस्था करतो अशी धमकी जाहीर सभेत दिली होती. पण महाडिक ही छत्रपती शिवाजी महाराजांची, जिजाऊंची भूमी आहे, हिम्मत असेल तर व्हिडीओ बनवा असे थेट आव्हान देत महिलांना धमकी देणाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्र उत्तर देईल असा विश्वास श्रीनेत यांनी व्यक्त केला.