शिष्यवृत्तीसह वसतिगृहांसाठी विद्यार्थी आक्रमक
अभाविपचे आंदोलन : विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वसतिगृहांची संख्या वाढविणे गरजेचे
बेळगाव : शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वसतिगृहांच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. याविरोधात बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौक येथे काही काळ रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटकातील मागासवर्गीय विभागाच्या अखत्यारित 1258 वसतिगृह आहेत. त्यामध्ये 1 लाख 68 हजार 833 विद्यार्थी आहेत. तर समाज कल्याण विभागाच्या अखत्यारित 1 हजार 972 वसतिगृह असून 1 लाख 87 हजार 200 विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये राहण्याची परवानगी आहे. मागील तीन वर्षात अर्ज केलेल्या 100 विद्यार्थ्यांपैकी केवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली जात आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नसल्याने उच्च शिक्षण घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वसतिगृहांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
जेवणासाठीची रक्कम वाढवून देण्याची मागणी
गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे किट पोहोचलेले नाही. तसेच 100 विद्यार्थ्यांची मर्यादा असलेल्या वसतिगृहात 140 ते 150 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला जेवणासाठी दरमहा 1850 रुपये दिले जात आहेत. या रकमेतून सकस आहार देणे शक्य होत नाही. त्यामुळे सरकारने ही रक्कम वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अभाविपचे विभागीय संघटक सचिन हिरेमठ, कुशल घोडगेरी, लिंगराज पुजारी यासह इतर उपस्थित होते.